अहिल्यानगर: सुमारे ४५० कोटी रुपयांचा गुंतवणूकदारांना गंडा घातल्याच्या ‘ट्रेड्स इन्व्हेस्टमेंट’ कंपनीच्या फसवणूक प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे. सुपा पोलीस ठाण्यात ज्याच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला, त्याच फिर्यादीसह त्याच्या कुटुंबातील इतर तिघेही आरोपी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

तपासी अधिकारी तथा आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांनी यासंदर्भातील माहिती न्यायालयापुढे सादर केली. विनोद गाडीलकर, विक्रम बबन गाडीलकर, पूजा विक्रम गाडीलकर व प्रमोद बबन गाडीलकर यांची नावे आरोपी म्हणून समाविष्ट करण्यात आली आहेत. या संदर्भात सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.

हा गुन्हा नंतर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला. विशेष म्हणजे जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. गाडीलकर कुटुंबाने या कंपनीत स्वतःची गुंतवणूक केली तसेच इतर गुंतवणूकदारांना प्रलोभन दाखवत कंपनीत पैसा गुंतवण्यास भाग पाडले. परिणामी शेकडो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचे पैसे या कंपनीत अडकले आहेत.

कंपनीने शेअर बाजारात गुंतवणूक करून दरमहा १० ते १५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी कंपनीने पंचतारांकित हॉटेलमध्ये मेळावा आयोजित करून सादरीकरण केले. सेबीचे बनावट परवाने सादर केले. बँक खात्यांचे दाखले वापरून गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यात आला. गाडीलकरने इतरांना गुंतवणूक जोडून दिल्यास ५० टक्के नफा देण्याचेही आमिष दाखवले. त्याने स्वतः ५ लाख १० हजार रुपयांची गुंतवणूक करून आपल्या मित्रपरिवाराला यात जोडले.

सुरुवातीला वेळेवर परतावा मिळत होता. मात्र, नोव्हेंबर २०२४ पासून त्यामध्ये खंड पडण्यास सुरुवात झाली. मे २०२५ मध्ये केवळ १.८ टक्के परतावा देण्यात आला. एप्रिल २०२५ मध्ये गुंतवणूकदारांच्या संमतीशिवाय सर्व खाती आयएफ ग्लोबल ट्रेडिंग लिमिटेड या नव्या पोर्टलवर स्थलांतरित करण्यात आली. गुंतवणुकीची रक्कम यूएसडीटीमध्ये शिफ्ट करून फसवणूक केल्याचे पोलीस तपासात आढळले आहे. गाडीलकर याने फिर्याद केल्यानंतर पोलिसांनी कंपनीचे संचालक व अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

मात्र, नंतर या प्रकरणात आपणही आरोपी ठरू शकतो, हे लक्षात आल्यानंतर त्याने न्यायालयात अटकपूर्वक जामिनासाठी अर्ज दाखल केला. न्यायालयापुढे म्हणणे सादर करताना तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक डॉ. गोर्डे यांनी गाडीलकर याच्यासह त्याच्या कुटुंबीयांचाही फसवणुकीत सहभाग असल्याने आरोपी करण्यात आल्याचे स्पष्ट केले.