सावंतवाडी :  गेले दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वैभववाडी तालुक्यातील करूळ घाटात दरड कोसळली. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली असून, यामुळे सुमारे दीड तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. रस्ते बंद झाल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, ज्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. ​तरेळे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर करूळ चेकनाका ते भट्टीवाडी स्टॉपदरम्यान रस्त्यावर दरडीचा मोठा भाग कोसळला. या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार आर. बी. वेल्हाळ कंपनी यांच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जेसीबीच्या साहाय्याने दरड बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. त्यामुळे दोन्ही बाजूला अडकलेल्या वाहनांना पुढे जाण्याचा मार्ग मोकळा झाला.