गारपिटीने नुकसान झालेल्या नाशिक भागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहणी दौरा करीत असतानाच शिवसेनेचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनीही तातडीने सांगली जिल्ह्यातील अवकाळीग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी करून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचे सांगितले. रावते यांचा सांगली दौरा अंतिम क्षणी आयोजित करण्यात आल्याने प्रशासनाची मात्र धावपळ उडाली.
राज्यात गेल्या आठवडय़ात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे द्राक्षपिकांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले आहे. राज्यात विदर्भ, मराठवाडय़ातील शेतकरी एकीकडे दुष्काळी स्थिती असताना अचानक अवकाळीने घाला घातल्याने शेतकरी अस्वस्थ बनला आहे. तासगाव तालुक्यातील विसापूर, खानापूर तालुक्यांतील नेवरी परिसरात अतिवृष्टी झाली असून तीन तासांत ८६ मिमी पावसाची नोंद या भागात झाली.
अवकाळीने झालेले नुकसान मोठे असल्याने शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परवानगीने आपण सांगली जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी दौरा करीत असल्याचे रावते यांनी सांगितले. त्यांचा दौरा अचानक जाहीर झाल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांची मात्र तारांबळ उडाली. रविवारी सुटी नियोजित केली असताना आणि युतीच्या मंत्र्यांचा पहिलाच दौरा असल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांना वेळ देण्यासाठी कसरत करावी लागली.
परिवहनमंत्री रावते यांनी गार्डी, विसापूर आणि नेवरी येथील नुकसानग्रस्त द्राक्षपिकाची पाहणी केली. त्यांच्यासमवेत आ. अनिल बाबर होते. नुकसानीचा पाहणी अहवाल आपण मुख्यमंत्र्यांना देणार असून, हानिग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीतजास्त मदत देण्याचा प्रयत्न करू असे त्यांनी या वेळी सांगितले. नुकसान झालेले ज्वारी, मका चारा म्हणून शासनाने खरेदी करावे आणि त्याचे दुष्काळी भागात वाटप करावे असा आमचा प्रस्ताव राहील असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आघाडी शासनाने राज्यावर साडेतीन लाख कोटींचे कर्ज केले असून, सध्या तिजोरीत खडखडाट आहे. मात्र शेतकऱ्याला मदत देण्यात राज्य शासन कमी पडणार नाही, अशी ग्वाही रावते यांनी पत्रकार बैठकीत दिली.
संग्रहित लेख, दिनांक 16th Dec 2014 रोजी प्रकाशित
अवकाळीग्रस्त द्राक्ष बागांची सांगलीत रावतेंकडून पाहणी
गारपिटीने नुकसान झालेल्या नाशिक भागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहणी दौरा करीत असतानाच शिवसेनेचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनीही तातडीने सांगली जिल्ह्यातील अवकाळीग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी करून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचे सांगितले.

First published on: 16-12-2014 at 04:07 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Transport minister divakar ravate inspecting grape gardens