औंढा नागनाथ तालुक्यातील देवस्थान, संस्थान व ईदगाहच्या ४०० एकर जमिनीवर अतिक्रमण झाल्याची तक्रार आमदार संतोष टारफे यांनी महसूलमंत्र्यांकडे केल्यानंतर या प्रकरणात तत्काळ चौकशी  करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याच तालुक्यातील रूपूर येथील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणाचा मुद्दा जिल्हाभर गाजत आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील रूपूर येथील गायरान जमीन गट क्र.१११ वरील अतिक्रमणाचे प्रकरण समोर आले होते. महसूल विभागाच्या नाकर्तेपणामुळे हे प्रकरण चांगलेच गाजले. महसूल विभागाने तक्रारदारांची दखल न घेतल्याने तक्रारदार दादाराव कोंडगे यांनी अखेर न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशावरून पोलिसांनी चौकशी करून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यामध्ये एका महिला आरोपीला जामीन मिळाला. परंतु तलाठी, मंडळ अधिकारी व सरपंचांनी अटकपूर्व जामीन मिळण्याचा प्रयत्न करूनही त्यांना तो मंजूर झाला नाही. या पाश्र्वभूमीवर तालुक्यातील देवस्थान, संस्थान व ईदगाहच्या ४०० एकर जमिनीवर अनधिकृतरीत्या ताबा असल्याची तक्रार आमदार डॉ. संतोष टारफे यांनी केली.
नालेगाव येथील गट क्र. १९, असेगाव येथील सर्वे क्र. १६, १७८, सर्वे नं.१८, तपोवन येथील सर्वे नं. ३१, ३५ व ५६, चिंचोली येथील गट क्र. ४१ ते ४४ तसेच १०५, १०७, १०८ व १२३, फेरजाबाद येथील गट क्र. ३१, ३२, ३३ याच प्रमाणे टाकळगव्हाण, गांगलवाडी अशा एकूण ८ गावांतील निवासी व देवस्थानाच्या ४०० एकर जमिनीवर खासगी व्यक्तींनी अनधिकृत ताबा घेतल्याचे सांगितल्यानंतर महसूलमंत्री खडसे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे आमदार टरफे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trespassing on god trust land in hingoli
First published on: 16-03-2015 at 01:20 IST