अकोले: आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या पुतळा विटंबनेच्या घटनेचे तीव्र पडसाद आज, शनिवारी अकोले तालुक्यात उमटले. राजूरमध्ये सकल आदिवासी समाजाने ‘आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे सन्मान मोर्चा ‘ काढत घटनेमागील सूत्रधार शोधण्याची मागणी केली तर या प्रकरणी दोन ठेकेदारांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल झाल्याच्या निषेधार्थ व गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी अकोले शहरात बंद पाळण्यात आला. हे गुन्हे मागे घेण्याची मागणी अकोले तालुका सिव्हील इंजिनियर असोसिएशनने केली.
तालुक्यातील देवगाव येथील आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू असताना तेथील राघोजी भांगरे यांचा पुतळा हलवून अडगळीच्या जागेत ठेवण्यात आला. पुतळ्याच्या चौथरा पाडण्यात आला. पुतळ्याच्या विटंबनेची तीव्र प्रतिक्रिया आदिवासी समाजात उमटली. या प्रकरणी दोन ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आज राजूरमध्ये माजी आमदार वैभव पिचड व त्यांचे राजकीय विरोधक युवा नेते अमित भांगरे यांच्यासह आदिवासी कार्यकर्ते व नागरिकांनी मोर्चा काढला. देवगाव येथे राघोजी भांगरे यांचे राज्यातील पहिले स्मारक. पुतळ्याच्या विटंबनेबद्दल संतप्त शब्दांत विविध कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या घटनेस जबाबदार असणाऱ्या सर्वांवर कारवाई करावी तसेच घटनेमागील सूत्रधार शोधावा अशी आग्रही मागणी केली गेली.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करताना या विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनेबाबत अधिकृत तक्रार न दिल्यास अधिकाऱ्यांना सहआरोपी करण्याची, दि. २४ सप्टेंबरपूर्वी पुतळा मूळ स्वरूपात बसविण्याची मागणी करण्यात आली. वैभव पिचड, अमित भांगरे, दिलीप भांगरे, अनंत घाणे, भारत घाणे, पांडुरंग खाडे, सी. बी. भांगरे, सुरेश भांगरे, राजेंद्र मधे, सचिन देशमुख, पोपट चौधरी आदींची भाषणे झाली.
गुन्हे मागे घेण्याची मागणी
दोन ठेकेदारांवर ‘ॲट्रॉसिटी’ अंतर्गत गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ आज अकोले शहरात बंद पाळण्यात आला. अत्यावश्यक सेवावगळता व्यवहार बंद होते. बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. बसस्थानक परिसरात निषेध सभा घेण्यात आली. बहुजन समाजातील सर्व पक्षीय नेते व कार्यकर्त्यानी घोषणा देत टायर जाळत प्रतीकात्मक निषेध केला. निषेध सभेत माजी जि. प. बाधकाम सभापती कैलास वाकचाैरे, अगस्ती कारखाना संचालक प्रदीप हासे, वकील वसंत मनकर, शिवसेनेचे शहराध्यक्ष सचिन शेटे, मनसेचे दत्ता नवले, शिवसेना तालुकाध्यक्ष मच्छिंद्र धुमाळ, उपजिल्हा प्रमुख महेश नवले, संभाजी ब्रिगेडचे डॉ. संदीप कडलग, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शरद चाैधरी, मराठा सेवा संघाचे लालुशेठ दळवी, मुस्लिम समाजाचे आरीफ तांबोळी, माधव तिटमे, स्वाती शेणकर, सुरेश नवले, प्रमोद मंडलिक आदींनी तीव्र भावना व्यक्त करत हे गुन्हे तातडीने मागे घेण्याची मागणी केली. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.