निखिल मेस्त्री

आदिवासींचे विविध अधिकार आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ‘आदिवासी अधिकार जाहीरनामा’ आणि घोषणापत्र संयुक्त राष्ट्रांच्या संकल्पनेतून आला असला तरी या जाहीरनाम्यातील आदिवासी अधिकाराची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे आजच्या आदिवासींच्या स्थितीवरून तरी दिसून येत नाही. याउलट आजही इथला आदिवासी समाज त्यांच्या मूलभूत अधिकारापासून वंचितच आहेत. आजही ते स्थलांतर करूनच जीवन कंठत आहेत.

जाहिरनाम्यातील अनुच्छेदाप्रमाणे सरकारने आदिवासींचे सबलीकरण, सक्षमीकरण, जीवनस्तर उंचावण्यासाठी विशेष प्रयत्न आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात सरकारला अपयश आले आहे.

९ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जात आहे.  या निमित्ताने पालघर जिल्हा हा आदिवासीबहुल जिल्हा म्हणून नव्याने महाराष्ट्रातील ३६वा  जिल्हा म्हणून उदयास आला असला तरी येथील अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी बांधव आजही अनेक सुविधांपासून वंचित आहे येथील आदिवासींचे आदिवासींचा जीवनस्तर आजही खालावलेलाच आहे हे स्पष्ट दिसत आहे

जिल्ह्यत आदिवासींच्या शिक्षणाबरोबर आरोग्य, रोजगार आदी सुविधांचा आजही अभावच आहे.अर्थात राजकीय इच्छाशक्ती बरोबरीने प्रशासकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळे आजही येथील आदिवासींचे जीवनमान खालावलेले आहे. जिल्ह्यत आदिवासींच्या शिक्षणाचा पुरता बोजवारा उडालेला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा या शिक्षण देत असल्या तरी त्या दुरुस्ती अभावी असुरक्षित आहेत. आदिवासी विकास विभाग जव्हार व डहाणू अंतर्गतच्या आश्रम शाळा आदिवासींच्या मुलांसाठी शिक्षण देणसाठी असल्या तरी त्याची पटसंख्या आदिवासींच्या लोकसंख्येच्या मानाने कमीच आहे. आदिवासी समाजातील मुले मुली जिल्हा परिषद शाळेत आठवी ते नववी पर्यंत शिक्षण घेतात व त्यांचे पुढे काय होते.

आदिवासी समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यात आल्या असा कागदोपत्री शासनाने म्हटले असले तरी जिल्ह्यत जे स्वत: आदिवासी जीवन जगत आहेत, अगदी तोकडय़ा प्रमाणात सरकारी योजना आणि त्यासुद्धा अगदीच प्रभावहीन असल्याचे दिसून येत आहे.

रोजगार नाहीच

स्थानिक रोजगाराची उपलब्धता नसल्याने जिल्ह्यतील हजारो आदिवासी कुटुंबीय जिल्ह्यअंतर्गत व जिल्हाबाहेर स्थलांतर होत आहेत.यामुळे हि कुटुंबीय आपल्या पोराबाळांसह त्या ठिकाणी स्थलांतरित होतात.असे होत असताना ते व त्यांचे कुटुंबीय ज्या परिस्थितीचा सामना करीत आहेत त्याचे दु:ख सरकारने कधी जाणलेच नाही.ही मंडळी शहराकडे पोटाच्या खळगीची भूक मिटविण्यासाठी रोजगाराच्या शोधात येतात.