अकोले : आज भर पावसात आदिवासी भागातील नागरिकांनी एकत्र येऊन अवैध दारू विक्री बंद व्हावी, यासाठी भंडारदरापासून जवळच असणाऱ्या वारंघुशी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले. अनेक दिवस पोलिसांना निवेदन देऊनही दारू विक्री थांबत नसल्याने शेवटी संतापून भर पावसात आदिवासी भागातील महिला, सरपंच, कार्यकर्ते, नागरिक यांनी दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनाचा पर्यटकांना फटका बसला.

भंडारदरा परिसरातील विविध गावांतील सरपंच, उपसरपंच यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. पोलीस व उत्पादन शुल्क अधिकारी यांनी या गावातील अवैध दारू विक्री थांबवण्याचे लिखित आश्वासन दिल्यानंतरच रास्ता रोको थांबवण्यात आला.

वारंघुशी व आजूबाजूच्या ज्या ज्या गावांत अवैध दारू विकली जाते, तेथील विक्री त्वरित बंद व्हावी. आजपर्यंत जितके गुन्हे या विक्रेत्यांवर दाखल झाले आहेत ते सर्व गुन्हे एकत्र करून त्यांच्यावर तडीपारची कारवाई व्हावी व त्यांच्या उताऱ्यावर दंड बसवला जावा. ज्या बीट अंमलदारकडे ही गावे आहेत त्या बीट अंमलदारवर कारवाई करून त्यांची बदली केली जावी. शेंडी भंडारदरा येथील ज्या परवानाधारक दुकानातून ही दारू येते त्या दुकानाचे ऑडिट करून ते दुकान सील करण्यात यावे. त्याचप्रमाणे राजूर हे दारूबंदीचे गाव असल्याने व आदिवासी गावांचे मुख्य केंद्र असल्याने तिथे पोलीस निरीक्षक हे स्वतंत्र पद निर्माण करण्यात यावे आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.

वारंघुशीच्या सरपंच फसाबाई बांडे व उपसरपंच समीर मुठे यांनी जनतेच्या संयमाची परीक्षा पाहू नये, अन्यथा गावागावांतील लोक अवैध दारू उद्ध्वस्त करतील, असा इशारा दिला. यावेळी उत्पादन शुल्क अधिकारी सहस्त्रबुद्धे व पोलीस उपनिरीक्षक दीपक सरोदे यांनी या गावांमधील अवैध दारू विक्री बंद होईल, असे लेखी आश्वासन दिले. प्रकाश कोरडे, विलास कडाळी, कमल घाणे, दीपक भागडे, अनंत घाणे, तसेच वारंघुशी गावातील महिला, ग्रामस्थ, तरुण मंडळी, रंधा गावचे सरपंच सुंदरलाल भोईर, जहागीरदार वाडीचे सरपंच पंढरीनाथ खाडे, पेंडशेत गावचे सरपंच सोमनाथ पदमेरे, चिंचोडी गावच्या सरपंच कविता मधे यांचे सह पंचक्रोशीतील ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले होते.