नाशिक :  सामाजिक परिवर्तन, सामाजिक न्यायासाठी झटणाऱ्या आदिवासी बांधवांनी देशाच्या जंगल संपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी पार पाडली आहे. अन्यायाच्या विरोधात जे लढतात, त्यांना नक्षलवादी म्हणता येणार नाही. कायदा हातात घेऊन काही लोक नक्षलवाद पसरविताना आदिवासी बांधवांना बदनाम करत असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथे रविवारी क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन आणि आदिवासी सांस्कृतिक महोत्सव २०२१ कार्यक्रमात पवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी, पालकमंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, बीजमाता राहीबाई पोपरे, आ. हिरामण खोसकर आदी उपस्थित होते.

पवार यांनी आदिवासी हा देशाचा मूळ निवासी असून त्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवता येणार नसल्याचे सांगितले. त्यांना त्यांचे हक्क देण्याची, त्यांचा सन्मान करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. आदिवासी समाजातील इतर घटकात अंतर ठेवण्याचे कुठलेही कारण नाही. अठरा पगड जातींना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केले. त्यामुळेच ते रयतेचे राज्य म्हटले जाते. राघोजी भांगरे, बिरसा मुंडा यांनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी जे योगदान दिले, त्याचे स्मरण आणि जतन भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांत वर्तमान आणि पुढील पिढय़ांसाठी करण्याची जबाबदारी आपल्या सर्वाची असल्याचे पवार यांनी सांगितले.

मराठी साहित्य संमेलनात आदिवासी संस्कृतीचे प्रदर्शन आयोजित करून नागरिकांना आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात येईल असे पालकमंत्री भुजबळ  यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tribals who fighting against injustice cannot be called naxalites says sharad pawar zws
First published on: 15-11-2021 at 01:34 IST