कराड : कराड तालुक्यातील कालवडे गावचा सुपुत्र आणि भारतीय सैन्यातील लान्स नायक आदित्य थोरात (२६) यांचे आकस्मिक निधन झाल्याने संपूर्ण कालवडे पंचक्रोशीवर शोककळा पसरली. देशसेवेत अखंड निष्ठा आणि शौर्याने कार्यरत राहिलेला हा जवान अचानक आपल्यातून गेल्याने ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत होती. याप्रसंगी हजारोंचा जनसागर लोटला होता.
आदित्य थोरात यांच्या मागे आई, वडील, भाऊ व बहीण असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने थोरात कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण कालवडे व पंचक्रोशीतील ग्रामस्थ थोरात कुटुंबाच्या दुःखात सहभागी झाले आहेत. कालवडे या गावाने एक शूर, धाडसी व कर्तव्यनिष्ठ सैनिक गमावल्याची भावना या वेळी व्यक्त करण्यात आली.
आदित्य थोरात गेल्या दहा वर्षांपासून भारतीय सैन्यात कार्यरत होते. सिक्कीम येथील आर्मी सप्लायर कोर बटालियनमध्ये त्यांनी जबाबदारीने सेवा बजावली. सेवेदरम्यान, त्यांची प्रकृती अचानक बिघडली व उपचारांपूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.
आदित्य थोरात यांचे पार्थिव शनिवारी मूळगावी कालवडे येथे आणण्यात आले. या वेळी त्यांच्या कुटुंबीय व नातेवाइकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. ग्रामस्थ व उपस्थितांनाही अश्रू आवरता आले नाहीत. आदित्य थोरात यांचे नातेवाईक, मित्रपरिवार, शेजारी, मान्यवर आणि गावकरी मोठ्या संख्येने अंतिम दर्शनासाठी हजर होते. आदित्य थोरात यांच्या पार्थिवाची फुलांनी सजवलेल्या ट्रकमधून मिरवणूक काढण्यात आली. या वेळी ‘वीर जवान अमर रहे!’, ‘भारत माता की जय!’ अशा घोषणांनी या दु:खदायी प्रसंगी उपस्थितांमध्ये हळव्या भावनाही दाटून आल्या होत्या.
यानंतर सकाळी नऊच्या सुमारास कालवडे येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात तसेच सैन्य दलातील जवानांनी सलामी दिल्यानंतर जवान आदित्य थोरात यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. या प्रसंगी लष्करी अधिकारी, माजी सैनिक, शासकीय यंत्रणा, स्थानिक नेते, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थित होते. अनेकांनी पुष्पचक्र व पुष्पांजली अर्पण करून आदित्य थोरात यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत अखेरचा निरोप दिला.