चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाचे राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर (४७) यांचे दिल्ली येथील मेदांता हॉस्पिटल मध्ये मंगळवारी पहाटे निधन झाले. शनिवारी सायंकाळी वडील नारायणराव धानोरकर यांच्या निधनानंतर खासदार धानोरकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने नागपूरातील खासगी रुग्णालयातून विशेष एअर रुग्णवाहिकेद्वारे पुढील उपचारासाठी दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात हलवण्यात आले होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्याप्रती श्रद्धांजली अर्पण केली आहे.

हेही वाचा >> खासदार बाळू धानोरकर यांचं निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास

“काँग्रेसचे चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचे अकाली निधन अत्यंत दुःखद आहे. स्पष्टवक्तेपणा आणि धडाडीने काम करण्याची वृत्ती या व्यक्तिगुणांनी राजकीय वर्तुळात त्यांची ओळख होती. चंद्रपूरसारख्या दुर्गम भागातील प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या सहसंवेदना व्यक्त करतो. भावपूर्ण श्रद्धांजली”, असं ट्वीट शरद पवारांनी केलं आहे.

“महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे खासदार व माझे संसदेतील सहकारी बाळूभाऊ धानोरकर यांचे निधन झाले. ही बातमी अतिशय दुःखद व धक्कादायक आहे. त्यांच्यावर उपचार सुरु होते. ते बरे होतील अशी आशा होती परंतु ते शक्य झाले नाही. या कठिण प्रसंगी आम्ही सर्वजण त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभाताई धानोरकर व कुटुंबियांसोबत आहेत. भावपूर्ण श्रद्धांजली”, अशा सहवेदना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही व्यक्त केल्या.

“काँग्रेसचे चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर (४८) यांचं उपचारादरम्यान निधन झाल्याचं वृत्त अत्यंत धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली! धानोरकर कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. ईश्वर त्यांना हे दुःख पचविण्याची शक्ती देवो, ही प्रार्थना!”, अशा भावना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केल्या.

“चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन झाल्याची दुःखद बातमी समजली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि या दुःखातून सावरण्याचे बळ त्यांचे कुटुंबीय, सहकारी व कार्यकर्त्यांना मिळो, हीच आई-जगदंबेचरणी प्रार्थना!”, अशा भावना राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केल्या.

“चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे कॉंग्रेसचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या निधनाचं वृत्त धक्कादायक आहे. चंद्रपूरच्या जनतेशी एकरुप झालेलं नेतृत्व, धडाडीचे लोकप्रतिनिधी, कर्तव्यनिष्ठ लोकसेवक अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनानं जनतेशी घट्ट नाळ जुळलेलं तरुण नेतृत्व आपण गमावलं आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची, महाविकास आघाडीची मोठी हानी झाली आहे. दिवंगत बाळूभाऊ धानोरकर यांच्या कुटुंबियांच्या, सहकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी असून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो”, अशी प्रतिक्रिया राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी दिली.

“चंद्रपूरचे काँग्रेस पक्षाचे खासदार श्री. बाळू धानोरकर यांच्या निधनाची बातमी मनाला चटका लावणारी आहे. लोकांसाठी कार्य करण्याची तळमळ, नेतृत्व क्षमता यामुळे त्यांनी अल्पावधीतच आपला जनसंपर्क दांडगा केला. दोनच दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलांचे देखील निधन झाले होते. धानोरकर परिवारावर झालेला हा आघात सहन करण्याची ताकद त्यांना मिळो. त्यांच्या दुःखात संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परिवार सहभागी आहे. भावपूर्ण श्रद्धांजली”, असं ट्वीट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खासदार धानोरकर यांच्या निधनाने कुटुंबीय व काँग्रेस पक्षाला जबर धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी वरोराच्या आमदार प्रतिभा धानोरकर, दोन मुले, आई, भाऊ भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, बहीण व बराच मोठा आप्त परिवार आहे. खासदार बाळू धानोरकर यांचे पार्थिव वरोरा येथील निवासस्थानी दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत अंतिम दर्शनाकरिता ठेवण्यात येणार आहे. अंतिम संस्कार वरोरा येथील वणी बायपास स्मशानभूमी येथे होईल.