धाराशिव : तुळजाभवानी देवी मंदिरातील महत्वाचे घोटाळे ज्या संचिकांमुळे उघडकीस येऊ शकतात, त्या ५५ संचिका अद्याप गायबच आहेत. दोन वर्षांपूर्वीच संचिका गायब असल्याचा स्पष्ट अहवाल तीन सदस्यीय समितीने सादर केला होता. तो दडवून आता पुन्हा नव्याने चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्या संशयिताच्या विरोधात चौकशी केली जात आहे. त्याच्याच हाती मंदिरातील आस्थापनेचा कारभार ठेवण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी संबंधित कर्मचार्‍यावर कारवाईसाठी जिल्हाधिकार्‍यांनी सुरू केलेल्या कार्यवाहीचे काय झाले? हा प्रश्न मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे.

तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील प्राचीन आणि दुर्मिळ दागिन्यांची चोरी, चोरी करणारे आरोपी, प्रशासनातील सहभागी असलेल्या कर्मचारी आणि अधिकार्‍यांचे गोपनीय अहवाल, अशा एक ना दोन तब्बल ५५ संचिका तुळजाभवानी मंदिरातून दोन वर्षांपासून गायब आहेत. मंदिरातील अनेक घोटाळे दडपून टाकण्यासाठीच या संचिका गायब केल्या असल्याचा आरोपही सातत्याने केला जात आहे. दोन वर्षांपूर्वी या संचिका गायब असल्याचा स्वयंस्पष्ट अहवाल मंदिर समितीला सादर करण्यात आला होता. त्यानंतरही संबंधित अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
तुळजाभवानी मंदिर समितीच्या वतीने तहसीलदारांनी लेखा अधिकारी सिद्धेश्वर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लेखापाल सिद्धेश्वर इंतुले आणि सहाय्यक स्थापत्य व्यवस्थापक राजकुमार भोसले यांची समिती मार्च २०२२ मध्ये गठीत केली होती. या समितीने दोन महिने कसून चौकशी केली आणि २ मे २०२२ रोजी ५५ संचिका मंदिराच्या अभिलेखा कक्षातून गायब असल्याचा स्पष्ट अहवाल दिला. तत्कालीन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनीही याप्रकरणी संबंधित कर्मचारी जयसिंग पाटील यास कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्याचे समाधानकारक उत्तर न आल्याने २४ मे २०२२ रोजी आस्थापना विभागात कर्तव्य परायनतेमध्ये कसूर झाला असल्याचा शेरा मारत जयसिंग पाटील यांच्या विरोधात दिवेगावकर यांनी कारवाई प्रस्तावित केली. तोच धागा पकडत जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनीही यापूर्वीच्या पत्रव्यवहारांचा आणि तीन सदस्यीय समितीने दिलेल्या अहवालाचा संदर्भ देत सात दिवसांच्या आत गायब असलेल्या संचिकांचे अभिलेखा कक्षात नोंदी करून घ्याव्यात आणि त्याचा सविस्तर अहवाल सादर करावा, असे आदेश दिले. १५ मार्च २०२३ रोजी हे आदेश निर्गमित करण्यात आले होते. मात्र त्यावर पुढे काहीच झाले नाही.

हेही वाचा – Jayant Patil On Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तारावरून जयंत पाटलांचा महायुतीला टोला; म्हणाले, “काही असंतुष्ट आत्मे…”

संबंधित कर्मचार्‍याकडून आस्थापना विभागाचा पदभार काढून घेण्यात आला आणि त्यानंतर काही दिवसांनीच पुन्हा आस्थापना विभागाचा कारभार याच संशयित कर्मचार्‍याकडे सोपविण्यात आला. ज्या अहवालावरून कारवाई सुरू झाली होती, तो अहवाल दडवून ठेवण्यात आला आणि आता पुन्हा २८ जून २०२४ रोजी पुन्हा नव्याने तीन सदस्यीय समिती नियुक्त करून गहाळ असलेल्या ५५ संचिकांचा शोध घेण्याचा आदेश मंदिर तहसीलदाराकडून जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने जारी करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मंदिरातील अत्यंत संवेदनशील आणि महत्वाचा विभाग म्हणून ज्या आस्थापना विभागाकडे पाहिले जाते, त्या आस्थापना विभागाच्या चाव्या संशयित कर्मचार्‍याच्याच हाती ठेवण्यात आल्या आहेत. मंदिर प्रशासनाच्या एकूण कारभाराच्या पारदर्शकतेवरच त्यामुळे शंका उपस्थित केल्या जात आहेत.

हेही वाचा – “…तर आम्ही निर्णय घेणार”, बच्चू कडू यांचा महायुती सरकारला इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

म्हणणे मांडण्याची संधी मिळायला हवी : जिल्हाधिकारी

मंदिरातील ५५ संचिका गहाळ प्रकरणी वस्तुनिष्ठ पद्धतीने चौकशी सुरू आहे. यात कोणी दोषी आढळून आल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल. मात्र संबंधित विभागातील कर्मचार्‍यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची योग्य संधीही मिळायला हवी. त्यासाठीच पुन्हा एकदा या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी तीन सदस्यांची समिती गठीत करण्यात आली असल्याची प्रतिक्रिया तुळजाभवानी मंदिर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी दिली आहे.