छत्रपती संभाजीनगर : तुळजापूरमध्ये सापडलेल्या ६१ ग्रॅम ड्रग्ज प्रकरणात १६ आरोपी अटकेत आहेत. याशिवाय आणखी २१ जणांचा या प्रकरणात सहभाग असल्याने २१ जण पोलिसांनी शोधले असून यातील बरेचजण तुळजाभावनी मंदिरात पुजारी म्हणून काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपींपैकी कोण काय काम करते, याचा तपशील आमच्याकडे नाही. मात्र, मंदिर संस्थानकडे पुजाऱ्याच्या अधिकृत यादी आहे. त्यांना हवी असल्यास आरोपींच्या नावाची यादी जिल्हाधिकाऱ्यांना सुपर्द केली जाईल असे धाराशिवचे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले.

तुळजापूरमध्ये आतापर्यंत ६१ ग्रॅम ड्रग्ज सापडल्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली. अगदी तालुका पातळीपर्यंत होणाऱ्या अंमली पदार्थाच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेने अधिक प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या प्रकरणात पोलिसांनी १६ आरोपींना अटक केली आहे.

या अनुषंगाने बोलताना जिल्हाधिकारी कीर्तीकुमार पुजार म्हणाले, ‘तुळजाभवानी मंदिरातील पुजाऱ्यांची अधिकृत अशी यादी नाही. ड्रग्ज प्रकरणातील गुन्ह्या प्रकरणातील प्रथम नोंदणी अहवालच्या प्रती मागविण्यास सांगितल्या आहेत. त्यात कोणी पुजारी आहे का, याची तपासणी आम्ही करू. अद्यापि यातील तपासात कोणी पुजारी आहे का, हे सांगता येणार नाही. ’