हळदीची आवक वाढल्याने दर कोसळणार !

किमान दराचे कोणतेच संरक्षण नसल्याने शेतकऱ्याचे नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे.

turmeric
सांगलीच्या बाजारात सध्या हळदीची आवक मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. सध्या बाजारात रोज आठ ते नऊ हजार पोती आवक होत आहे. छाया- इम्रान मुल्ला

‘पी हळद, हो गोरी’ ही म्हण प्रचलित आहे. नववधूच्या अंगाला हळद लागल्याविना सौंदर्य खुलत नाही, असे म्हणतात. अशा हळदीच्या बाजारासाठी जगप्रसिद्ध असणाऱ्या सांगलीच्या बाजारात या वर्षी हळदीची मोठय़ा प्रमाणात आवक होत आहे. यंदा हंगामाच्या प्रारंभीच क्विंटलला सात हजारांपासून १२ हजारांपर्यंत दर मिळत असला तरी आवक वाढण्याची भीती व्यक्त करण्यात होऊ लागल्याने सांगलीच्या बाजारावर प्रभुत्व असलेले व्यापारी दर पाडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. किमान दराचे कोणतेच संरक्षण नसल्याने शेतकऱ्याचे नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे.

केवळ आयुर्वेदच नव्हे तर आधुनिक अ‍ॅलोपॅथी उपचारामध्येही औषधी गुणधर्मामध्ये हळदीला महत्त्वाचे स्थान आहे. सौभाग्याचं लेणं म्हणून असलेला हळदी-कुंकूचा मान आणि याचबरोबर रोगप्रतिकारकशक्ती असलेल्या हळदीला आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्व आहे. कोणताही धार्मिक कार्यक्रम हळदीविना पार पडत नाही. लग्न समारंभात तर हळदीशिवाय सुरुवातच होत नाही. नववधू-वरांना हळद लावण्याचा खास विधी परंपरेने सांगितला आहे. यामागे केवळ धार्मिकता नसून सुदृढ आरोग्याचा सल्ला पूर्वजांनी दिला आहे.

आज सौंदर्यप्रसाधनामध्ये जसा हळदीचा वापर केला जातो तसा अनेक आजारांवर रामबाण इलाज म्हणूनही हळदीचा गुणधर्म असल्याने जागतिक स्तरावर हळदीला मागणीही प्रचंड आहे. मात्र या हळदीचे उत्पादन घेणारा शेतकरी मात्र या बाजाराच्या अर्थशास्त्रामध्ये जमेतच धरला जात नाही. जगात हळदीचा दर हा सांगलीच्या बाजारपेठेवर अवलंबून असताना सांगलीत उत्पादकांना बाजारातील चढउताराचा लाभ मिळत तर नाहीच पण यातील नसर्गिक दरवाढीपासून उत्पादक कोसो दूरच राहिला आहे.

यंदाच्या हंगामातील हळद सध्या सांगलीच्या बाजारात येत असून दर मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत कमीच आहेत. क्विंटलला सात हजारांपासून ते बारा हजारापर्यंत दर मिळत आहे. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने हळदीचे उत्पादनही चांगले आले असून सांगलीच्या बाजारात स्थानिक पातळीबरोबरच आंध्र, तामिळनाडू, कर्नाटक आदी राज्यांतून हळदीची आवक होत आहे. दररोज नऊ ते १० हजार पोती हळदीची आवक होत असून आणखी दोन महिने ही आवक वाढतच राहणार आहे.

गेल्या वर्षी सांगलीच्या बाजारात राजापुरी हळदीची ७ लाख ७४ हजार २६२ क्विंटल आवक झाली होती. तर परपेठ हळदीची आवक १ लाख ६२ हजार ३४६ क्विंटलची होती. या वर्षी सुरुवातीलाच सुमारे दीड लाख क्विंटलची आवक झाली असून यापकी ३० टक्के आवक ही परपेठेतील हळदीची आहे. चालू वर्षी हळदीचे उत्पादन चांगले असल्याने आवक वाढणार यात शंकाच नाही. मात्र गेल्या वर्षी सरासरी मिळालेला ९६७८ हा दर या वेळी मिळण्याची शक्यता कमी वाटत आहे.

हळदीचा दर हा प्रामुख्याने मागणीवर ठरत असला तरी मूठभर व्यापारी मंडळीच हा दर निश्चित करीत असल्याचे दिसून येत आहे. कारण हळद ही नित्य लागणारी वस्तू असताना आणि रोज नवनवीन हळदयुक्त उत्पादने बाजारात येत असतानाही मागणीत वाढ होणे स्वाभाविक असताना दर मात्र मिळत नाही. यामागील अर्थशास्त्र समजून घेतले तर साठेबाजी हे मुख्य कारण दिसून येते.

दर पाडण्यासाठी बऱ्याचदा आवक वाढली असल्याची आवई उठविली जाते. यामुळे शेतकरी मिळेल तो दर स्वीकारून माल विकला गेला या समाधानात राहतो. मात्र हाच माल पुन्हा बाजारपेठेत चढय़ा दराने सौद्यात आणण्याचे प्रकार सांगलीच्या बाजारात नवे नाहीत. याचबरोबर काही वेळा हमाल, मापाडी आणि वाहतूकदार यांच्या संघटित शक्तीचा वापर करीत सौदेच होणार नाहीत याचीही दक्षता घेतली जाते. याचे परिणाम बाजारावर होतात. बाजार समिती अथवा पणन महामंडळ उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेत असल्याचे प्रकर्षांने जाणवत नाही. रोजची आवक, विक्री याची नोंद काटेकोरपणे केली तरी मिळणारा सेस आणि यातील गळती नजरेस आल्याविना राहणार नाही. मात्र या चोरवाटा बंद कराव्यात अशी इच्छाशक्ती अभावानेच आढळत असल्याचे खेदाने नमूद करावेच लागेल.

  • सांगली बाजारपेठेत हळदीपासून पूड तयार करणारे कारखाने मोठय़ा प्रमाणात आहेत. या ठिकाणी खरेदी केलेल्या हळदीची केवळ पूड केली तर त्याचा दर एकदम वाढतो, मात्र कच्च्या मालाला दर मिळत नाही. प्रक्रिया उद्योग स्थानिक पातळीवर नसल्यानेच हळद उत्पादकांना बाजारातील तेजीमंदीचा लाभ मिळत तर नाहीच याचबरोबर किमान विक्री मूल्य अनिश्चित असल्याने बाजारात खरेदीदार देईल तोच दर घेणे भाग पडते.
  • हळदीची लागवड करण्यासाठी शेतकऱ्याला बियाणासाठीच एकरी नऊ ते १० क्विंटल जेठय़ा हळदीच्या कंदाची खरेदी करावी लागते. १० महिन्यांच्या या पिकासाठी लागवडीबरोबरच रानाची मशागत, खत आणि अन्य कामासाठी एकरी सुमारे एक लाख खर्च येतो.
  • हळदी पीक तयार झाल्यानंतर काढणी, शिजवणी, निवड आणि मळणी यासाठी वेगवेगळ्या टप्प्यावर मजुरांची गरजही मोठी आहे. एवढे करून एकरी उत्पादन १८ ते २५ क्विंटल हळद मिळते. यामुळे या पिकाकडे शेतकरीवर्गाचा कल वाढत असून, हळदीची स्थानिक बाजारपेठ पोषक असली तरी मिळणारा दर तुलनेत कमीच आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Turmeric production increases