सातारा : कास पठारावरील जंगल परिसरात तेटलीवरून साताऱ्याकडे निघालेल्या एसटी बसला अंधारी गावच्या हद्दीत धोकादायक वळणावर समोरून आलेल्या डंपरने जोरदार धडक दिली. या धडकेत बसमधील ३२ पैकी २० प्रवासी गंभीर जखमी झाले.

कास पठारावरील जंगल परिसरात ‘एस’ वळणावर तेटलीहून साताऱ्याकडे येणाऱ्या बसला समोरून साताऱ्याहून येणाऱ्या भरधाव डंपरने जोरदार धडक दिली. या धडकेत एसटी बस शंभर फूट मागे जात डोंगरकड्यावर जाऊन थांबली, ही एसटी बस अजून थोडी मागे गेली असती तर दरीत कोसळून मोठी जीवितहानी झाली असती. अपघाताचा मोठा आवाज आल्याने स्थानिकांनी बसकडे धाव घेतली. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र बामनोली, तसेच सर्वसाधारण जिल्हा रुग्णालय सातारा व साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात होताच डंपर चालकाने पळ काढला.

कास पठारावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे होत असल्याने धनदांडग्यांच्या कामासाठी भरधाव वेगाने डंपर धावत असतात. यामुळे स्थानिकांच्या जीवितला अनेकदा धोका निर्माण होतो. अपघाताचे आणि वादाचे प्रसंग वारंवार उद्भवत असतात. या अपघाताची नोंद मेढा पोलीस ठाण्यात झाली आहे.