राहाता: शेतामध्ये खत पांगविल्यानंतर शेजारी असलेल्या ओढ्यावर हातपाय धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या चुलत भावांचा पाय घसरून पाण्यात पडल्याने, एकमेकांना वाचविण्याच्या नादात दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील गोगलगाव येथे घडली.

बुधवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.साहिल दत्तात्रय चौधरी (वय १८) व किरण नारायण चौधरी (वय १५ दोघे रा. गोगलगाव, राहाता) असे मृत मुलांची नावे आहेत.

किरण चौधरी हा ९ वी उत्तीर्ण झाला होता तर साहिल चौधरी हा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) शिक्षण घेत होता. किसन तुकाराम तनपुरे (वय ६०, गोगलगाव) हे शेतपिकाला पाणी भरत असताना त्यांच्या शेजारी राहणारी दोन्ही मुले हे त्यांच्या शेतामध्ये खत पांगवत होते. खत पांगविल्यानंतर दोघेजण शेजारील ओढ्यावर हातपाय धुण्यासाठी गेले. त्यावेळी दोघे पाय घसरून पाण्यात पडल्याने तेथील महिलांनी मोठ्याने ओरडण्याचा आवाज केला. आवाज ऐकून किसन तनपुरे तेथे पळत गेले. परंतु पाणी जास्त असल्याने दोघांना त्यांनी पाण्यात बुडताना पाहिले.

तत्काळ रुग्णवाहिकेतून दोन्ही मुलांना उपचारासाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच दोघांचे निधन झाल्याचे सांगितले. किसन तनपुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार लोणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.