सोलापूर : आयकर व दंड भरण्यासाठी एका उद्योजकाने विश्वासाने दिलेली सुमारे दोन कोटींची रक्कम आयकर सल्लागाराने परस्पर हडप करून फसवणूक केल्याचा प्रकार बार्शी शहरात उजेडात आला आहे. याप्रकरणी संबंधित आयकर सल्लागाराविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा – सातारा : ‘बियर प्रणित विकास नको’ महाराष्ट्र अंनिसची भूमिका
हेही वाचा – सांगली : कोयना धरणातील पाणी कपात अमान्य, राष्ट्रवादीचे आंदोलन
यतीशकुमार बाबूराव गायकवाड (वय ५१, रा. मांगडे चाळ, बार्शी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नितीन बकाल (वय ४०, रा. बार्शी) असे गुन्हा दाखल झालेल्या आयकर सल्लागाराचे नाव आहे. फसवणुकीचा प्रकार १७ नोव्हेंबर २०१८ ते १ जुलै २०२० या कालावधीत घडला. उद्योजक यतीशकुमार गायकवाड यांनी आयकर सल्लागार नितीन बकाल यांना थकीत आयकर आणि दंड भरण्यासाठी दोन कोटी २१ लाख ९९ हजार ७८९ रुपये एवढी रक्कम विश्वासाने दिली होती. परंतु त्यापैकी अवघी २५ लाख २२ हजार ७८९ रुपये एवढी रक्कम बकाल यांनी आयकर विभागाकडे भरली. उर्वरीत एक कोटी ९६ लाख ७७ हजार रुपये एवढी रक्कम परस्पर हडप करून गायकवाड यांचा विश्वासघात आणि फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक गिरीगोसावी हे करीत आहेत.