संगमनेर : भूमिगत गटार सफाई दरम्यान झालेल्या दुर्घटनेत दोघांना जीव गमवावा लागला. याप्रकरणी नगरपालिकेच्या ‘एसटीपी’ प्रकल्पाच्या ठेकेदार कंपन्या मे. आर. एम. कातोरे अँड कंपनी आणि बी. आर. क्लिनिंग यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नगरपालिकेने सांडपाणी व्यवस्थापनासाठी एसटीपी प्रकल्प हाती घेतला आहे. या अंतर्गत भूमिगत गटारांचे जाळे टाकण्यात आले आहे. काल, गुरुवारी कोल्हेवाडी रस्त्यावरील गटारसफाईचे काम सुरू असतान गटारात उतरलेल्या अतुल रतन पवार (वय १९, रा. संजय गांधीनगर, संगमनेर) या कर्मचाऱ्याचा आणि त्याला वाचवण्यासाठी गेलेला रियाज जावेद पिंजारी (वय २१, रा. मदिनानगर, संगमनेर) याचा गुदमरून मृत्यू झाला.

पालिकेचे आरोग्याधिकारी अमजद बशीर पठाण यांनी शहर पोलीस ठाण्यात मध्यरात्री फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीनुसार, एसटीपी प्लांटच्या मुख्य ठेकेदार कंपनीचे रामहरी मोहन कातोरे आणि निखिल रामहरी कातोरे (दोघे रा. गोविंदनगर, संगमनेर), तसेच बी. आर. क्लिनिंगचा ठेकेदार मुश्ताक बशीर शेख (रा. शिवाजीनगर, संगमनेर) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ठेकेदारांनी नगरपालिकेशी केलेल्या करारनाम्यातील अटी व शर्तींचे उल्लंघन केले. सफाईचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची योग्य काळजी घेतली नाही. तसेच, आरोग्य विभागाची परवानगी न घेता, आवश्यक सुरक्षासाधनांशिवाय मजुरांना गटारात उतरवले. कर्मचाऱ्याचा मृत्यू होऊ शकतो, याची जाणीव असतानाही निष्काळजीपणाचे कृत्य केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. पुढील तपास शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख करत आहेत. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी

गटार सफाईचे काम करताना दोघांचा झालेला मृत्यू दुर्दैवी, वेदनादायी आहे. संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हे मृत्यू ओढवले असून त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक शासनाकडून योग्य ती मदत मिळवून देऊ. या घटनेस दोषी मूळ ठेकेदारासह गुन्हा दाखल झालेल्यांवर कठोर कारवाई करावी.आमदार अमोल खताळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

५० लाखांची भरपाई द्यावी

नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी अनाधिकृतपणे भूमिगत गटार जोडली. त्यामुळे सफाईच्या कामात दोन कामगारांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना नगरपालिकेने किंवा सरकारने तातडीने प्रत्येकी ५० लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी. नगरपालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी आज, शुक्रवारी विधान परिषदेत केली.