सांगली : महापालिका क्षेत्रातील व्यवसाय परवाना सुलभ करण्यात आला असून, आता ११ ऐवजी केवळ दोनच कागदपत्रांची पूर्तता केल्यास तत्काळ परवाना देण्यात येणार असल्याचे आयुक्त सत्यम गांधी यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.
महापालिका क्षेत्रातील व्यवसायासाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाने कोणताही व्यवसाय करण्यासाठी व्यवसाय परवाना घेणे बंधनकारक आहे. तथापि बाजार व परवाना विभागामार्फत हा परवाना सुलभ पद्धतीने देण्यात येणार आहे, असे सांगून आयुक्त गांधी म्हणाले, की हा क्रांतिकारक निर्णय आहे.
महानगरपालिका क्षेत्रातील अनेक व्यवसायधारक यांनी व्यवसाय परवाने घेतले नसल्याचे निदर्शनास आले आहे. याचे कारण पाहिले असता व्यवसाय परवाना घेण्यासाठी अनावश्यक कागदपत्रांची मागणी केली जात असल्याने परवाना घेण्याकडे व्यावसायिकांचे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे आवश्यक असलेल्या ११ कागदपत्रांपैकी ओळखपत्र, भोगवटा प्रमाणपत्र व अर्ज या कागदपत्रांच्या आधारे यापुढे व्यवसाय परवाना देण्यात येणार आहे.
महानगरपालिका हद्दीमध्ये अंदाजे 4 हजार 200 व्यावसायिक परवानाधारक आहेत. परवाना सुलभीकरण झाल्याने महापालिका क्षेत्रात अधिकृत व्यवसाय परवानाधारकांची संख्या वाढणार आहे. विशिष्ट घातक व अपायकारक व्यवसायासाठी मात्र मूळ कार्यपद्धतीप्रमाणे कागदपत्रे जोडावी लागणार आहेत, असेही आयुक्त गांधी यांनी स्पष्ट केले.
व्यावसायिकांनी महापालिकेचा रीतसर परवाना घेतला नसेल, त्यांनी वरील कागदपत्रांची पूर्तता करून महापालिकेच्या स्व. मदनभाऊ पाटील व्यापारी संकुल येथील पहिल्या मजल्यावरील बाजारपरवाना कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. महापालिका क्षेत्रात व्यवसाय करत असताना ११ कागदपत्रांची पुर्तता करावी लागत होती. हे काम किचकट आणि वेळखाउ असल्याने अनेक व्यावसायिक परवाना घेण्याचे टाळत होते.
यामुळे व्यवसाय करत असताना अनेक अडचणी तर येतच होत्या, मात्र, याचबरोबर बँकेचे कर्ज मिळवण्यात आणि व्यवसाय वृध्दी करण्यात अडचणी येत होत्या. तसेच महापालिकेत व्यवसायाची नोंदणीच केली नसल्याने महापालिकेला उत्पन्नही मिळत नव्हते. आता व्यवसाय परवाना सुलभीकरण झाल्यानंतर व्यावसायिकांची सोय तर होणारच आहे, याचबरोबर व्यवसाय वाढविण्यासाठीही चांगला उपयोग होणार आहे.
आधार कार्ड आणि व्यवसायाच्या जागेबाबत भोगवटा धारक असल्याचा पुरावा हे दोन महत्वाचे कागद आणि व्यवसाय सुरू करण्यासंबंधी आवश्यक नोंदणी अर्ज सादर केल्यानंतर महापालिकेकडून व्यवसायासाठी आवश्यक परवाना मिळणार आहे. मात्र, मानवी जीवास घातक व अपायकारक व्यवसाय सुरू करण्यासाठी परवाना घेत असताना पुर्वी प्रमाणेच आवश्यक कागदपत्रांची गरज भासणार आहे.