मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या सिडकोतील दोन युवकांचा विल्होळी येथे बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाला. तलावावर आधीपासून पोहत असलेल्या युवकांनी मदत करण्याऐवजी पळ काढला. राहुल चव्हाण (१७) आणि अक्षय पवार (२०) अशी मृत्यू झालेल्या युवकांची नावे आहेत. सिडकोत वास्तव्यास असणारे तीन मित्र कामगार दिनाची सुट्टी असल्याने फिरण्यासाठी गेले होते. विल्होळी येथे दोघे बंधाऱ्यात आंघोळीसाठी उतरले आणि चिखलात अडकले. त्यांचा मित्र अंकुश ननावरे याने वाचविण्याचा प्रयत्न केला. पण तो अयशस्वी ठरला. मदतीसाठी कोणी आले नाही. तलावावर आधीपासून पोहत असलेल्या युवकांनी तेथून पळ काढला. तासाभराने या घटनेची माहिती समजल्यानंतर गावातील युवक धावून आले. त्यांनी दोघांना बाहेर काढले. परंतु, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विल्होळीच्या बंधाऱ्यात यापूर्वी अशा घटना घडून तीन ते चार युवकांचा मृत्यू झाला आहे.