दिल्लीत सात दिवस अलगीकरण

वसई : करोनाच्या जागतिक फैलावामुळे देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमा बंद झाल्याने परदेशी जहाजात अडकलेले सुमारे दोनशे भारतीय सोमवारी सकाळी दिल्ली विमानतळावर उतरले. यामध्ये १५ वसईकर तरुणांचा समावेश असून या सर्वाची रवानगी अलगीकरण केंद्रात करण्यात आली आहे. या तरुणांच्या सुखरूप सुटकेसाठी वसईच्या सागरशेत येथील रॉसली गोन्सालवीस यांनी देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता.

करोना विषाणूचा जागतिक स्तरावर प्रादुर्भाव झाल्यानंतर जगभरातल्या देशांनी आपापल्या सागरी, हवाई तथा भूसीमा बंद केल्या. जागतिक टाळेबंदीच्या या परिस्थितीमुळे परदेशात काम करणारे असंख्य भारतीय अडकले. त्यांच्या सुटकेसाठी भारत सरकारने ‘वंदे भारत’ मोहीम सुरू केली होती. याही स्थितीत फ्रान्स देशातील मार्सिले बंदरात कोस्टा क्रुझ कंपनीच्या ‘कोस्टा स्मेराल्डा’ या जहाजात २०० भारतीयांसह वसईतील १५ तरुण अडकले होते. तब्बल १४० दिवस हे तरुण या ठिकाणी अडकून होते. हे तरुण विविध पदांवर जहाजात कामास होते. ते सुखरूप मायभूमीत परत यावे म्हणून वसईच्या सागरशेत येथील रॉसली गोन्सालवीस या तरुणाने स्थानिक लोकप्रतिनिधींच्या साहाय्याने देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे पाठपुरावा केला.

या पाठपुराव्याला यश आले आहे. ‘वंदे भारत’ मोहिमेंतर्गत फ्रान्समधून विमानसेवा नव्हती. वसईकर तरुण अन्य भारतीयांसह १८ जुलैला संध्याकाळी ५ वाजता वाहनाने रोमला निघाले. १४ तासांच्या प्रवासानंतर ते रोममधील एफओसी विमानतळावर पोहोचले. तेथून सोमवारी (२० जुलै) सकाळी हे सर्वजण विमानाने दिल्लीला परतले.

वसईकर तरुणांना सुखरूप आणण्यासाठी देशाचे परराष्ट्रमंत्री सुब्रह्मण्यम जयशंकर, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नालासोपाराचे आमदार क्षितिज ठाकूर, वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर, महापौर प्रवीण शेट्टी, पोलीस अधिकारी संदेश हंबिरे यांचे सहकार्य लाभले, अशी माहिती या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे रॉसली गोन्सालवीस यांनी दिली.

पाण्यात बंदिस्त अवस्थेत असलेले आमचे वसईकर तरुण मायभूमीत परतले याचा आम्हाला विशेष आनंद आहे. या सर्वाची रवानगी दिल्लीतील ताज हॉटेलमधील अलगीकरण केंद्रात करण्यात आली असून सात दिवसांच्या अलगीकरणानंतर सर्व वैद्यकीय चाचणी होऊन ते विमानाने वसईत दाखल होतील.

– रॉसली गोन्सालवीस, वसई