नांदेड : उमरी येथून सावरगाव (कला) गावाकडे आपल्या दुचाकीवरून जाताना रस्त्यावरच उभ्या असलेल्या एका ट्रॅक्टरवर दुचाकी आदळल्याने झालेल्या अपघातामध्ये दोघे जण जागीच ठार झाले. ही घटना रामखडकफाटा ते सावरगाव फाटा रस्त्यावर सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली.
उमरी तालुक्यातील सावरगाव (कला) येथील माधव संभाजी जोगदंड (वय ४५) आणि आनंदा दिगंबर खांडरे (वय ३७) हे दोघे आपल्या दुचाकीवरून गावाकडे जात असताना रस्त्यावरच उभ्या असलेल्या एका ट्रॅक्टरवर त्यांची दुचाकी आदळून झालेल्या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले.
या घटनेमुळे सावरगाव (कला) गावावर शोककळा पसरली असून मंगळवारी सकाळी उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. चंदापुरे यांनी दोघांवर शवविच्छेदन करून त्यांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहेत.या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध उमरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठेकेदाराचा नादुरुस्त ट्रॅक्टर रस्त्यावरच उभा होता. त्याला लाईट नसल्याने अंधारात तो दिसला नाही. त्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले.