येथील गुंड प्रवीण दिवटे हत्या प्रकरणी दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, रविवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास त्याच्या पार्थिवावर शेकडो लोकांच्या उपस्थितीत मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास त्याच्या घरून अंत्यायात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेत शहरवासीयांसोबतच बाहेर गावावरून आलेले लोक सहभागी झाले होते. रस्त्याच्या दुतर्फा लोकांची गर्दी होती. कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याच्यादृष्टीने पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. प्रवीणची लहान मुलगी सोनल हिने मुखाग्नी दिला. उपस्थितांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. गर्दीमुळे नागपूर येथून यवतमाळकडे येणारी वाहने काहीकाळ थांबविण्यात आली.
शनिवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास झालेल्या प्रवीण दिवटे हत्या प्रकरणात शहर पोलिसांनी रविवारी स्वीकृत नगरसेवक बंटी उर्फ आनंद जयस्वाल आणि जावेद अहमद अशा दोन संशयितांना अटक केली असून यापकी जावेद (१६) हा अल्पवयीन असून त्याची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली. याआधी तीन वेळा प्रवीणवर जीवघेणे हल्ले झाले होते. परंतु त्यातून तो सहीसलामत बचावला. चौथ्यांदा केलेल्या हल्ल्यातून मात्र तो वाचू शकला नाही. हा हल्ला अत्यंत सुनियोजित पध्दतीने करण्यात आला. मारेकरी घटनेच्या तीन ते चार दिवसांपासून पाळतीवर होते. प्रवीण एकटा असल्याची माहिती मिळताच त्याचा गेम करण्यात आला. प्रवीणवर हल्ला केल्यानंतर या घटनेचा प्रत्यक्षदर्शी तेथे काम करणाऱ्या मोनू बाजडला हल्लेखोरसोबत घेऊन गेले. त्याचे काय झाले अद्याप काहीच कळाले नाही. दरम्यान, यवतमाळ जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर आलेल्या अमरावती परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी या घटनेच्या संदर्भात आढावा बठक घेऊन माहिती घेतली.
प्रवीण हा गुन्हेगारी क्षेत्रासह राजकीय क्षेत्रातही प्रस्थ वाढविण्यात निष्णात होता. तो काँग्रेसचा नगरसेवक होता. परंतु त्याच्या सततच्या गुन्ह्य़ातील सहभागामुळे त्याला अडचणीचे वाटत होते. म्हणून त्याने पत्नी उषा दिवटेला नगरसेविका म्हणून निवडून आणले. आगामी नगर परिषद निवडणुकीच्या दृष्टीने त्याचे प्रयत्न सुरू होते. मोठी मुलगी, पत्नी आणि स्वत यावेळी निवडणूक लढण्याची तयारी होती. नगर सेवक जनतेतून निवडून द्यावयाचा असल्यामुळे सोईचे आरक्षण निघाले तर नगराध्यक्षाचीसुध्दा निवडणूक लढण्याची त्याची तयारी होती. तत्पूर्वी, रविवारी सकाळी प्रवीण दिवटेच्या मोठय़ा मुलीने घरीच पत्रकार परिषद घेऊन या हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची, त्यांच्यावर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्याची तसेच या प्रकरणाचा तपास यवतमाळच्या बाहेरील पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपविण्याची मागणी केली.
बोलघेवडेपणामुळे फसला जावेद
जावेद अहमद हा तसा बालगुन्हेगार, मागे दोन शरिरिक इजा प्रकरणात त्याचा सहभाग होता. तो स्वत:ला भाई, डॉन समजायला लागला. मित्रामध्ये ‘मं ही पीडी का गेम करूंगा’ असा तो बरळला. ही गोष्ट पोलिसांच्या कानावर गेली. ही घटना जरी जुनी असली तरी पोलिसांसाठी आता ती महत्त्वपूर्ण आहे. त्याच्या ‘त्या’ वक्तव्याच्या आधारावरच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याचे समजते.