|| निखील मेस्त्री

वाहतूक कोंडीमध्ये पदपथावरील अतिक्रमणाचीही भर:- सफाळेमध्ये अलीकडेच रस्त्याच्या दुतर्फा एक दिवसाआड  पी वन-पी टू योजनेचा अवलंब करण्यात आला. मात्र,  बेसुमार वाहन वाढीमुळे व दुचाकी वाहन पार्किंगचे नियोजन व्यवस्थित न राहत करता आल्यामुळे  एकंदरीतच ही योजना फोल ठरली आहे.

सफाळे स्थानक परिसराच्या आजूबाजूची चाळीस गावे या सफाळे बाजारपेठेवर अवलंबून आहेत. या पाश्र्वभूमीवर वाढत असलेली लोकसंख्या व बेसुमार दुचाकी वाहनांचा वापर यामुळे सफाळेमध्ये वाहन कोंडी होत असल्याची समस्या लक्षात घेता ग्रामपंचायत व पोलिस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने रस्त्याच्या डावीकडे व उजवीकडे पी वन-पी टु वाहन पार्किंग योजना १५ ऑगस्ट रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांच्या हस्ते योजनेचे उद्घाटन करून सुरू करण्यात आली.

ही योजना सुरु होण्याच्या दरम्यान काही काळ दुचाकी वाहन चालकांनी योजनेचा अवलंब योग्य पद्धतीने न केल्यामुळे पोलिसांनी या योजनेचा अवलंब करण्यासाठी व वाहन पार्किंगचे शिस्त लागण्यासाठी जनजागृती व उपाययोजना आखल्या. त्यानुसार आता ही वाहन पार्किंगचे योजना अवलंब करण्यास सुरू झाली असली तरी रेल्वे स्थानकापासून सुमारे १००  मीटर इतक्या कमी अंतराच्या रस्त्यावर व भर बाजारपेठेत ही योजना व जागा वाहनतळासाठी अपुरी पडू लागली आहे.

विशेषत:  ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन एखादे वाहनतळ उभे करणे अपेक्षित असताना वाहतूक कोंडीच्या ठिकाणीच ही पार्किंगचे व्यवस्था उभी केल्यामुळे नागरिकांना ती अडचणीची ठरत आहे    सफाळे रेल्वे स्थानक ते देवभूमी सभागृहाच्या पुढे हे वाहनतळ आहे. रस्त्याच्या दुतर्फा एक दिवसाआड वाहने लावण्याची ही योजना असली तरी हा रस्ता आधीच अरुंद आहे. त्यातच रस्त्याच्या बाजुला उभारलेल्या गटारावर पादचाऱ्यांना चालण्यासाठी पदपथ निर्माण करण्यात आले असले तरी या पदपथावरती मोठय़ा प्रमाणात अतिक्रमणे करण्यात आलेली आहेत. सोमवारी या ठिकाणी आठवडा बाजार भरतो. अशावेळी या अतिक्रमणमुळे मोठी कोंडी होत आहे.

पदपथावरती स्थानिक भाजी विक्रेती महिला मर्यादित वेळेसाठी इथे भाजीपाला विकण्यासाठी बसले असले तरी पदपथावर दुकाने थाटून बसलेल्या अतिक्रमित दुकानदारांचा फटका  वाहतूक कोंडीतून नागरिकांना थेट बसत आहे.

कोणतेही पूर्वनियोजन न करताही वाहनतळ योजना अमलात आणली गेल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. १४ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतीने या वाहनतळासाठीचा ठराव घेतला व १५ ऑगस्ट रोजी म्हणजेच एक दिवसानंतर लगेच या वाहनतळ योजनेचे उद्घाटन उरकून घेण्यात आले. असे असले तरी मोठय़ा प्रमाणात सफाळे परिसरांमध्ये येणाऱ्या दुचाकी वाहनांना वाहनतळासाठी अजूनही पर्यायी व्यवस्था उपलब्ध न झाल्यामुळे हे दुचाकीधारक आपली वाहने इतरत्र पार्किंगचे करून जात असल्यामुळे वाहतूक कोंडी बरोबरच पादचाऱ्यांना ही याचा मोठा फटका बसताना दिसत आहे.

नियोजित वाहनतळ ठिकाणावर मर्यादित वेळेत वाहन लावणे अपेक्षित असताना निरंतर वेळेसाठी वाहन लावून दुचाकी धारक जात असल्याने इतर दुचाकी धारकांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. अशा  दुचाकीवर कारवाई करण्यात आलेली आहे.  दुचाकी वाहन पार्किंगचे समस्या दूर करण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी नागरिकांनीही सहकार्य करणे अपेक्षित आहे.  -संदीप सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सफाळे पोलीस ठाणे</strong>

वाहनतळाच्या प्रस्तावासह पार्किंगचे व्यवस्था सुदृढ व ती नागरिकांसाठी सुलभ करण्याचा प्रयत्न राहणार आहे. कायदा सोबतीला घेऊन अतिक्रमणे हटविण्याबाबत ग्रामपंचायत सकारात्मक आहे. आमोद अरुण जाधव, सरपंच,सफाळे