Cyber Crime: देशातील डिजिटल पेमेंटच्या पद्धतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ऑनलाईन बिल भरणे, रेल्वे तिकीट, हॉटेल बुकिंगसह आदी गोष्टींसाठी यूपीआयद्वारे पैसे दिले जातात. मात्र, इंटरनेट आणि डिजिटल व्यवहारांचा वाढता वापर जेवढा फायद्याचा ठरत आहे, तितकाच तो धोकादायक देखील बनत असल्याचं दिसत आहे. कारण याच्याशी संबंधित फसवणुकीच्या घटना झपाट्याने वाढत आहेत.

आता महाराष्ट्रातील दोन वेगवेगळ्या घटनांत दोन महिलांची तब्बल २९ लाखांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महाराष्ट्रातील दोन महिलांना डिजिटल अटक घोटाळ्यांमध्ये २९ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. सायबर चोरट्यांनी बनावट एफआयआर आणि डीपफेक व्हिडीओ वापरून पीडितांना आर्थिक तपशील शेअर करण्यास भाग पाडलं आणि मोठी आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. या संदर्भातील वृत्त फ्री प्रेस जर्नलने दिलं आहे.

नेमकं घटना काय घडली?

पोलिसांच्या म्हणण्यानुसार अमरावती येथील रहिवासी असलेल्या एका तक्रारदाराला ६ ऑगस्ट रोजी एका पोलीस स्टेशनमधून बोलत असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीचा फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने संबंधित महिलेला सांगितलं की तिच्या आधारच्या तपशीलांचा वापर करून एक सिम कार्ड मिळालं आहे आणि त्याचा वापर अश्लील व्हिडीओ प्रसारित करण्यासाठी केला जात असल्याच्या २० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

दरम्यान, यानंतर तक्रारदाराला पुन्हा एक अधिकारी असल्याचं भासवणाऱ्या एका व्यक्तीकडून आणखी एक फोन आला आणि त्याने दावा केला की तिच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. असं सांगत त्या महिलेला तिचे सोन्याचे दागिने आणि तिच्या लॉकरमधील मालमत्तेची माहिती शेअर करण्यास सांगितलं. तसेच १३ ते १६ ऑगस्ट या दरम्यान तिला ऑनलाइन व्यवहारांद्वारे १७.२० लाख रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यास भाग पाडलं आणि तिची फसवणूक झाली. या प्रकरणात भारतीय न्याय संहिताच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

दुसऱ्या प्रकरणात काय घडलं?

दरम्यान, फसवणुकीची आणखी एक अशाच प्रकारची घटना घडली आहे. यामध्ये एका ५२ वर्षीय महिलेची डिजिटल अटक घोटाळ्यात १२.४० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या फसवण्यासाठी डीपफेक व्हिडीओ आणि बनावट एफआयआरचा वापर केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.

झालं असं की, एका खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या रायगडच्या रहिवासी असलेल्या एका तक्रारदाराला ३० ऑगस्ट रोजी एका व्यक्तीचा फोन आला की तिच्या आधार तपशीलांचा वापर बँक खातं उघडण्यासाठी करण्यात आला आहे. ज्यामध्ये फसवणुकीच्या प्रकरणाशी संबंधित २ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. तसेच संबंधित व्यक्तीने असंही सांगितलं की, तिच्या नावावर एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

त्यानंतर २ सप्टेंबर रोजी तिला आणखी एक फोन आला आणि यावेळी पोलिसांच्या गणवेशातील तीन पुरूष व्हिडीओ कॉलमध्ये दिसत होते. त्यापैकी एक जण महाराष्ट्र पोलीस अधिकारी म्हणून डीपफेक इमेज वापरल्याचं दिसून आलं. तेव्हा सायबर चोरट्यांनी तिला सांगितलं की अंमलबजावणी संचालनालयाची चौकशी सुरू आहे. तसेच तिच्या नावाचा एक बनावट एफआयआर देखील शेअर केला आणि तिच्या मुदत ठेवींची माहिती शेअर करण्यास सांगितलं. त्यानंतर तिला १२.४० लाख रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांत ट्रान्सफर करण्यास प्रवृत्त केलं आणि तिची फसवणूक झाली. या प्रकरणात देखील गुन्हा दाखल करण्यात आल्याचं वृत्तात म्हटलं आहे.