रत्नागिरी – राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, रत्नागिरी शाखेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. हॉटेल विवेक येथे झालेल्या शाखेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांनी ही घोषणा केली. नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे विश्वस्त असल्याकारणाने, नियमांनुसार रत्नागिरीसारख्या स्थानिक शाखेचे अध्यक्षपद भूषवणे योग्य नसल्याचे कारण देत त्यांनी या पदाचा राजीनामा दिला आहे.
नवीन अध्यक्ष निवड होईपर्यंत अध्यक्षपदाचा तात्पुरता कार्यभार विद्यमान कार्याध्यक्ष समीर इंदुलकर यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाला सभागृहाने एकमताने मंजुरी दिली. याबाबत बोलत्ताना पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, मी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्तीचा विश्वस्त आहे. त्यामुळे नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती अंतर्गत कार्यरत असलेल्या एखाद्या शाखेचा अध्यक्ष म्हणून काम करणे हे नैतिकदृष्ट्या आणि नियमांनुसारही उचित वाटत नसल्याने मी रत्नागिरी शाखेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे, असे सांगितले.
या राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर, उदय सामंत यांनी संस्थेच्या कामकाजात कोणताही खंड पडू नये यासाठी तात्पुरत्या स्वरूपात नवीन अध्यक्षपदाची निवड होईपर्यंत रत्नागिरी शाखेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार शाखेचे विद्यमान आणि अनुभवी कार्याध्यक्ष श्री. समीर इंदुलकर यांचेकडे सुपूर्द करावा, असे सांगितले. त्यांच्या या सूचनेला उपस्थित सर्व सभासदांनी आणि कार्यकारिणीने टाळ्यांच्या गजरात अनुमोदन दिले.