Uday Samant on Shivsena MLA’s Unhappy over dropped form Cabinet : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळाचा रविवारी (१५ डिसेंबर) विस्तार झाला. मात्र, मंत्रिपद न मिळाल्यामुळे अनेक आमदार नाराज असून त्यांनी त्यांची नाराजी उघड केली आहे. सुधीर मुनगंटीवार, तानाजी सावंत व छगन भुजबळांसह इतरही अनेक नेते नाराज आहेत. त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून व आपल्या कृतीतून त्यांची नाराजी प्रकट केली आहे. शिवसेनेचे (शिंदे) ज्येष्ठ नेते तानाजी सावंत नागपूरमधील हिवाळी अधिवेशून अर्ध्यात सोडून पुण्याला रवाना झाले. “आता मंत्रीपद दिले तरी स्वीकारणार नाही”, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेचे (शिंदे) नेते विजय शिवतारे यानी दिली आहे. यावर शिवसेना (शिंदे) नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सामंत म्हणाले, “आमचे ५७ आमदार आहेत आणि ११, १२ मंत्रिपदं आम्हाला मिळाली आहेत. अशा वेळी कोणाला मंत्रिपद द्यायचं आणि कोणाला नाही हे ठरवताना नेत्यांचा कस लागतो”.

शिवसेनेचे (शिंदे) ज्येष्ठ नेते व माजी मंत्री तानाजी सावंत, माजी मंत्री विजय शिवतारे नाराज असून दोघेही अधिवेशन सोडून निघून गेले आहेत. त्याबद्दल काय सांगाल? असा प्रश्न प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी उदय सामंत यांना विचारल्यावर ते म्हणाले, “एखाद्या नेत्याला मंत्रिपद मिळालं नाही तर तो नाराज होऊ शकतो. एकनाथ शिंदे त्यांची नाराजी दूर करतील. तसेच जे मंत्री झालेत त्यांच्यामध्ये कोणाची काही नाराजी असेल तर ती देखील दूर करणं आवश्यक आहे. आम्ही शिवसेना म्हणून विस्ताराने त्यावर काम करत आहोत. शिवसेनेत यावर चर्चा होत आहे. तानाजी सावंत, विजय शिवतारे ही शिवसेनेतील ज्येष्ठ मंडळी आहे. दोघेही मंत्री होते, त्यांना लवकरात लवकर आमचे उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री बोलावून घेतील आणि त्यांची समजूत काढतील. परंतु, तुम्हा प्रसारमाध्यमांच्या मनात आहे ते या दोघांच्या मनात नसेल, याची मी सर्वांना खात्री देतो”.

हे ही >> भुजबळ-मुनगंटीवारांच्या नाराजीवर भाजपाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हे दोन्ही नेते…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

…तर दोन तीन महिन्यांत आमचं मंत्रिपद काढून घेतलं जाईल : उदय सामंत

उदय सामंत म्हणाले, “आमचे इतर आमदारही मंत्रिपदासाठी पात्र आहेत. परंतु, आम्हाला ११ ते १२ मंत्रिपदं मिळाली आहेत. त्यापैकी मंत्रिपद कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं हा पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा निर्णय आहे. अशावेळी वरिष्ठांचा कस लागतो. त्यानंतर कोणी नाराज असतील तर त्यात वरिष्ठांचा दोष नसतो. मी चांगलं काम केलं नाही तर अडीच वर्षानंतर माझ्या जागी दुसऱ्या नेत्याला मंत्री केलं जाईल असं सांगितलं जात आहे. परंतु, अडीच वर्षे कशाला, मी जर चांगलं काम करत नसेल तर दोन-तीन महिन्यांत देखील माझं मंत्रिपद काढून घेतलं जाऊ शकतं. दोन-तीन महिन्यात चांगलं काम केलं नाही तर आमचे नेते आमचं मंत्रिपद काढून घेऊ शकतात, याची आमच्या मनात भीती आहे. त्यामुळे आम्हाला जनतेला अभिप्रेत असं काम करावं लागेल. सर्व नेत्यांना आमदारांना बरोबर घेऊन काम करावं लागेल. महायुतीला न्याय द्यावा लागेल”.