वाई : उदयनराजेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी शिवेंद्रसिंहराजे भोसले जयकुमार गोरे, मकरंद पाटील, महेश शिंदे, धैर्यशील कदम, अशोक गायकवाड उपस्थित होते.

भाजपच्या खासदार उदयनराजे भोसले यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल करताना जंगी शक्तिप्रदर्शन केले, महारॅली काढली. गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी रॅली झाली. या वेळी भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजितदादा गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महारॅली पोवई नाका येथे आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार दाखल झाले. त्यांनी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर उदयनराजेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. या वेळी सर्व आमदार उपस्थित होते.

आणखी वाचा-‘यमराज’ लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात ? रेड्यावर बसून उमेदवाराची जोरदार एन्ट्री

सातारा लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या माध्यमातून भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी साताऱ्यात जंगी शक्तिप्रदर्शन करत महारॅली काढली. जलमंदिर पॅलेस या त्यांच्या निवासस्थानापासून बैलगाडीतून उदयनराजे भोसले, शिवेंद्रसिंहराजे भोसले, अतुल भोसले हे गांधी मैदानावर रॅलीतून आले. तेथून स्वतंत्र सजवलेल्या दोन रथांच्या माध्यमातून महारॅली मार्गस्थ झाली. एका रथावर उदयनराजे भोसलेंसह मान्यवर सहभागी झाले होते. तर दुसऱ्या रथात महायुतीतील घटक पक्षांच्या महिला पदाधिकाऱ्यांसमवेत दमयंतीराजे भोसले याही सहभागी झाल्या होत्या.

गांधी मैदानापासून विराट जनसमुदायाच्या साथीने रॅली राजपथावरून मार्गस्थ झाली. या वेळी उदयनराजे यांच्या समवेत शिवेंद्रसिंहराजे भोसले, महेश शिंदे, अतुल भोसले, धैर्यशील कदम, आनंदराव पाटील, अशोक गायकवाड, तसेच दमयंतीराजे भोसले, सुरभी भोसले, सुवर्णा पाटील, चित्रलेखा माने कदम, आदींसह मान्यवर सहभागी झाले होते. महारॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शंभूराज देसाई, नरेंद्र पाटील, शिवेंद्रसिंहराजे भोसले, महेश शिंदे, आदींचे पोस्टर हातात घेऊन कार्यकर्ते महारॅलीत सहभागी झाले होते. तसेच शिवसेना, भाजपचेच तसेच राष्ट्रवादीचे पोस्टर होते.

आणखी वाचा-“महाराष्ट्राच्या बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांची पीआर टीम इन्फ्लुअन्सर्स आणि…”, आदित्य ठाकरेंचा दावा; आव्हान देत म्हणाले…

सकाळी उदयनराजेंनी ढोल्या गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तसेच अदालत वाडा येथे जाऊन काका कै. शिवाजीराजे भोसले, काकी कै. चंद्रलेखाराजे भोसले यांच्या प्रतिमेस अभिवादन करून शुभाशीर्वाद घेतले. त्यानंतर जलमंदिर पॅलेसमधील तुळजाभवानी माता तसेच राजमाता कल्पनाराजे भोसले यांचे शुभाशीर्वाद घेतले. यावेळी पत्नी दमयंतीराजे भोसले यांनी त्यांचे औक्षण केले. त्यानंतर उदयनराजे अर्ज भरण्यासाठी रवाना झाले.

उदयनराजेंचा उमेदवारी अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार, शंभूराज देसाई उपस्थित होते. अर्ज दाखल केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित जनसमूहाला संबोधित केले.