Shivsena UBT Uddhav Thackeray Press Conference मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की मी त्रिभाषा सूत्र स्वीकारणार नाही तर पाच मिनिटांत हिंदी सक्तीचा विषय संपेल. मात्र सादरीकरण वगैरे गोष्टी केल्या जात आहेत. भाजपाकडून एकाधिकारशाही लादण्याची ही पावलं आहेत असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तसंच भाजपाकडून भाषिक आणीबाणी लादली जात असल्याचंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

भाजपाकडून भाषिक आणीबाणी लादली जाते आहे-उद्धव ठाकरे

आमचा विरोध हिंदी भाषेला नाही तर हिंदी सक्तीला आहे. हिंदीला विरोध नाही कारण हिंदी चित्रपटसृष्टी मुंबईतच जन्माला आली. अमिताभ बच्चन असतील, हिंदी कलाकार असतील, गायक असतील हे मुंबईत आले आणि मोठे झाले. हिंदी सिने तारे-तारका इथे येऊन मोठी होतात. एकाधिकारशाहीकडे भाजपाची वाटचाल सुरु आहे. आणीबाणी लादल्याचा विषय भाजपाने आणला होता. त्यांनी बुधवारच्या दिवशी विरोध दर्शवला पण मी हे सांगतो आहे की भाषिक आणीबाणी आहे. भाषिक आणीबाणी भाजपाकडून लादली जाते आहे असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे.

हिंदी सक्तीचा निर्णय घेतला जाणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार-उद्धव ठाकरे

हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला जाणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन झालं आहे. आपल्या देशाची रचना भाषावर प्रांतरचना झाली आहे. प्रांत मिळाल्यानंतर राजधानी, मुख्यमंत्री मिळाले. मी मुख्यमंत्री असताना मला मराठी भाषेची सक्ती करावी लागली होती. ती सक्ती मी केली होती त्याबद्दल या सरकारने काय केलं? हे माझ्या वाचनात आलेलं नाही. मराठी रंगभूमीचं दालन करायचं ठरवलं होतं, आराखडा मंजूर झाला होता पण महाराष्ट्र द्रोही सरकारने ते हाणून पाडलं. बिल्डर्सच्या घशात ती जमीन घातली आहे. मी मुख्यमंत्री असताना मराठी भाषा भवनाचंही भूमिपूजन झालं होतं तिथे एकही वीट रचली गेलेली नाही. अजित पवार तेव्हा माझ्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होते. हे जे काही चाललं आहे ते त्यांना मान्य आहे का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.

लहान मुलांवर हिंदी लादू देणार नाही-उद्धव ठाकरे

हिंदी भाषा आम्ही या सरकारला लहान मुलांवर लादू देणार नाही. हिंदी येत नसल्याने कुणाचंही काहीही अडलेलं नाही. भाजपाचं एकाधिकारशाहीचा छुपा अजेंडा मराठी भाषिक आणि मराठी भाषेचे पुत्र हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. मी आज तमाम मराठी माणसांना आमच्या लढ्यात पक्षीय भेदाभेद विसरुन सहभागी होण्याचं आवाहन करतो आहे. मराठी कलाकार, साहित्यिक, खेळाडू, वकील अशा सगळ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावं. भाजपाच्या अस्सल मराठी प्रेमींनीही आंदोलनात सहभागी व्हायला पाहिजे असंही माझं आवाहन आहे. हिंदी भाषेची सक्ती काहीही झालं तरीही लादू देणार नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्रिभाषा सूत्र कशाला? २० भाषा सूत्र का नाही?

त्रिभाषा सूत्र म्हणून जर का आमच्यावर हिंदी लादली जाणार असेल तर कर्नाटकातल्या मराठी बांधवांवर जेव्हा मराठी बोलले म्हणून अन्याय होतात तेव्हा हे सूत्र कुठे जातं? आम्हाला त्रिभाषा सूत्रच मान्य नाही. सगळ्या राज्यांची वेगवेगळी भाषा आहे मग त्रिभाषा सूत्रच का? २० भाषा सूत्र का नाही? २५ भाषा सूत्र का नाही? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.