शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेमध्ये उघड उघड दोन गट पडले आहेत. शिंदे यांच्यासोबत ३० पेक्षा जास्त आमदार आहेत. याच कारणामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शिवसैनिकांशी तसेच बंड पुकारलेल्या आमदारांशी संवाद साधला. त्यांनी मी मुख्यमंत्रिपद सोडायला तयार आहे. फक्त एकदा समोर येऊन सांगा असे आवाहन आमदारांना केले आहे. तसेच आजपासून मी माझा मुक्काम वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानातून मातोश्री या माझ्या निवासस्थानावर हलवत आहे, असेदेखील त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>> ५ वाजेपर्यंत बैठकीला हजर राहा नाहीतर… नोटीस बजावणाऱ्या शिवसेनेला शिंदेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “आजच्या आमदारांच्या…”

“मी माझा मुक्काम आजपासून वर्षावरुन मातोश्रीवर हलवत आहे. मला कोणताही मोह नाही. मी ओढून ताणून खुर्चीला चिपकून राहणारा नाही. मी बाळासाहेब ठाकरेंचा पुत्र आहे मला कोणताही मोह थांबवू शकत नाही. पण मला समोर येऊन बोला. उगीचच काहितरी शिवसेनेशी आम्ही गद्दारी करणार नाही, याला अर्थ नाही. हे सगळं कशासाठी करताय? यामध्ये कोणाचे नुकसान होणार आहे? कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ अशी सध्या परिस्थिती आहे,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा >>> “सेनेला संपवल्याचा राऊतांना आनंद झाला असेल”, नारायण राणेंची बोचरी टीका, म्हणाले…

तसेच, “आजपर्यंत मला सर्वांनीच कमालीची मदत केलेली आहे. प्रशासनाने तर खूपच मदत केली. काय योग्य काय अयोग्य याबद्दल मला प्रशासनाने सांगितलं. मला दु:ख कशाचं वाटतंय? धक्का कशाचा बसला? याबद्दल मला बोलायचं आहे. मला शरद पवार आणि कमलनाथ यांनी फोन केला होता. त्यांनी मला सांगितलं की, आम्ही तुमच्यासोबत आहेत. मात्र माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नकोय. मी त्यांना माझं म्हणतोय ते मला माझं म्हणत आहेत की नाही, हे मला माहिती नाही. सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा थेट समोर येऊन बोलायचं होतं; की आम्हाला तुम्ही मुख्यमंत्रिपदी नकोत. आजजरी त्यांच्यापैकी एकाही आमदाराने समोर येऊन मला सांगितंल, की उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर नकोत; तर मी आता मुख्यमंत्रिपदाचा राजीमाना द्यायला तयार आहे,” असेदेखील मुख्यमंत्री म्हणाले.