शिवसेनेचं ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) राज्यस्तरीय अधिवेशन नाशिकमध्ये पार पडत आहे. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यासाठी आम्हीही प्रचार केला होता. तेव्हा आम्ही भ्रष्टाचारी नव्हतो का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, “शिवसैनिक ही माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे. शिवसैनिक मला वारसा हक्कानं मिळालेले आहेत, चोरून मिळालेले नाहीत. नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यासाठी आम्हीही प्रचार केला होता. तेव्हा आम्ही भ्रष्टाचारी नव्हतो का? वर्षानुवर्षे शिवसैनिकांनी खस्ता खालल्या आहेत. मगच तुम्हाला दिल्ली दिसली. पुचाट भाजपावाल्यांमुळे तुम्हाला दिल्ली दिसली नाही. माझ्या शिवसैनिकांमुळे दिल्ली दिसली आहे. ते सगळे शिवसैनिक गुन्हेगार आहे का मग?”
हेही वाचा : “आपली शिवसेना पळवणाऱ्या वालीचा राजकीय वध..”, उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंविरोधात आक्रमक
“मुंबईत दंगली पेटल्यावर शिवसैनिकांनी गावागावांमध्ये हिंदुंचं रक्षण केलं होतं. आम्ही शिवसेनेचा की भाजपाचा आहे, हे विचारत बसलो नाही. राजन साळवींचं कुटुंब भेटलं, वाकणार नाही म्हणाले. संजय राऊत तुरुंगात जाऊन आले आहेत. अचानक तुम्हाला सगळे भ्रष्ट वाटायला लागले. तुमच्या भ्रष्टाचाऱ्याचे पाढे आम्ही वाचतो आहे, त्याच्या चौकशा लावा. आम्ही लावणार आणि तुम्हाला तुरूंगात टाकणारच आहोत,” असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे.
“राम की बात झाली, आता काम की बात करो. दहा वर्षात तुम्ही काय केलं. राम एक वचनी होते, तुम्ही कुठे एकवचनी आहात. शिवसेनेला दिलेलं वचन पाळलं नाही,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी भाजपावर केली आहे.