महाविकास आघाडीच्या काळात राज्यपालनियुक्त १२ आमदारांचा प्रश्न वेगवेगळ्या कारणामुळे कायम चर्चेत राहिला. महाविकास आघाडी सरकारने १२ आमदारांच्या नावाची यादी देऊनही त्या यादीला तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मान्यता दिली नव्हती. यावरच बोलताना कोश्यारी यांनी मला उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल नियुक्त करण्यासाठी पत्रात धमकी दिली होती, असा दावा केला आहे. यावरच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. कोश्यारी यांनी जो दावा केला तो योग्य आहे, असे फडणवीस म्हणाले आहेत. ते आज (२१ फेब्रुवारी) माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

कोश्यारी यांनी केलेला दावा योग्य

“राज्यपालांना अजित पवार यांनी पत्र लिहिले नव्हते. ते पत्र उद्धव ठाकरे यांनी लिहिले होते. मी भगतसिंह कोश्यारी यांची मुलाखत पाहिलेली नाही. मात्र कोश्यारी यांनी जो दावा केलेला आहे, तो योग्य आहे,” असे फडणवीस म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी पत्राचा फॉरमॅट बदलला नव्हता

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्राचा फॉरमॅट बदलला नव्हता, असेही फडणवीस यांनी सांगितले. “मला मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही पक्षाचे नेते राज्यापालांना भेटायला गेले होते. त्यानंतर अशा प्रकारे धमकीच्या पत्रावर राज्यपाल कधीच कारवाई करत नाहीत. योग्य फॉरमॅटमध्ये पत्र पाठवा, असे राज्यपालांनी तिन्ही पक्षाच्या नेत्यांना सांगितले होते. मात्र उद्धव ठाकरेंचा यामध्ये इगो होता. त्यामुळे त्यांनी पत्राचा फॉरमॅट बदलला नव्हता,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

भगतसिंह कोश्यारी यांनी काय आरोप केला?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी पदावरून जाईपर्यंत त्या पत्रावर सही केली नाही. कारण त्यावेळी मुख्यमंत्री पदावर बसलेल्या उद्धव ठाकरेंनी मला पत्रातून धमकीच दिली होती. १२ आमदारांची नियुक्ती पंधरा दिवसांच्या आत किंवा त्याच्याही आधी करा अशी धमकीच देण्यात आली होती. राज्यपाल हा काही राज्याचा रबरस्टँप नसतो. पाच ओळींचं पत्र लिहिलं असतं तरीही मी त्यांची मागणी मान्य केली असती. मला पत्रातून धमकी देण्यात आल्याने मी १२ आमदारांची नियुक्ती केली नाही,” असं भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे.