बारसूतील प्रस्तावित रिफायनरीवरून मोठा वाद सुरू आहे. या प्रकल्पाला स्थानिकांनी कडाडून विरोध केला आहे. याविरोधात स्थानिक ग्रामस्थ आंदोलनही करत आहेत. तर पोलिसांकडून या आंदोलकांविरोधात बळाचा वापर झाल्याचं निदर्शनास आलं आहे. दरम्यान, आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजापूरमध्ये जात येथील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्र सोडलं.

हेही वाचा – “…तर बारसू रिफायनरी प्रकल्प पुढे न्यावा”, समृद्धी महामार्गाचा दाखला देत अजित पवार म्हणाले…

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“लोकांची डोकी फुटली तरी चालतील, कोकणातील लोक भिकारी झाले तरी चालतील. मात्र, रिफायनरी झाली पाहिजे, अशी शिंदे सरकारची भूमिका आहे. मात्र, बारसूमधील लोकांना रिफायनरी नको असेल तर इथे रिफायनरी होता कामा नये, जर हुकूमशाहीने हा प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र पेटवू”, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर केली आहे.

“…तर असा विकास आम्हाला नको”

“मी मुख्यमंत्री असताना टाटा एअरबस, बल्कड्रग्ज पार्क असे अनेक प्रकल्प महाराष्ट्रात आणले होते. मात्र, हे सर्व प्रकल्प गुजरातला हलवण्यात आले आणि आता वादग्रस्त प्रकल्प महाराष्ट्राच्या माथी मारण्यात येत आहेत. त्यामुळे राख महाराष्ट्राला आणि रांगोळी गुजरातला असं मी होऊ देणार नाही. आपल्याच जनतेला नुकसान पोहोचवून हे सरकार विकास करणार असेल तर असा विकास आम्हाला नको”, असेही म्हणाले.

हेही वाचा – “आम्ही बारसूतल्या कष्टकऱ्यांसोबत, भांडवलदारांच्या दलालांसोबत नाही” संजय राऊत यांची टीका

“मी ‘जन की बात’ ऐकायला आलोय”

“आज मी कोकणात ‘मन की बात’ करायला आलेलो नाही, तर ‘जन की बात’ ऐकायला आलो आहे. शिवसेना ही बारसूतील लोकांच्या पाठिशी आहे. जर येथील लोकांना रिफायनरी नको असेल तर काहीही झालं तरी इथे रिफायनरी होऊ देणार नाही”, असा इशाराही त्यांनी दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्री शिंदेंवरही केली टीका

दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांनाही लक्ष्य केलं. “महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आज ३३ देशात गद्दार म्हणून ओळखलं जातं. आमच्या सरकारमध्ये मंत्री असताना त्यांना महाराष्ट्रातील तीन जिल्हेसुद्धा ओळखत नव्हते”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.