राजधानी दिल्लीत आज इंडिया आघाडीची बैठक होत असून त्या बैठकीसाठी आघाडीतील सर्व घटक पक्षांचे प्रमुख वा प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. काँग्रेसनं पुढाकार घेऊन या बैठकीचं आयोजन केल्यामुळे या बैठकीत पक्ष म्हणून काँग्रेसकडून ठाम भूमिका मांडली जाण्याची शक्यता आहे. एकीकडे या बैठकीमुळे राष्ट्रीय राजकारण तापल्याचं दिसत असताना दुसरीकडे या बैठकीसाठी दिल्लीत दाखल झालेले उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून खोचक शब्दांत टोलेबाजी केली आहे. यामध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावल्याचं दिसून आलं.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरेंना यावेळी पत्रकारांनी अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत विचारणा केली. अजित पवार गटाकडून २०२४मध्ये तेच राज्याचे मुख्यमंत्री होतील, असे दावे केले जात असल्याबाबत विचारलं असता त्यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यावरून खोचक टोला लगावला. “प्रत्येकाला स्वप्न बघण्याचा अधिकार आहे. अजून त्यावर कर लागलेला नाहीये. नाहीतर तीही यंत्रणा आपल्याकडे कदाचित येऊ शकते. ते म्हणू शकतात की ‘तुम्हाला पंतप्रधान होण्याचं स्वप्न पडलं होतं. त्यामुळे कर भरा’. पण जोपर्यंत असं काही होत नाही तोपर्यंत त्यांना स्वप्न बघायचं तर बघू द्या”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांना टोला?

दरम्यान, यावेळी उद्धव ठाकरेंनी राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही अप्रत्यक्ष टोला लगावला. “आज मी दिल्लीत विविध नेत्यांच्या भेटीगाठी सुरू करेन. आत्ता मी जरी थंडीसाठी जॅकेट घातलं असलं, तरी मला हुडी किंवा गॉगल घालून कुणाला भेटायची गरज नाही. जे करतो ते मी खुलेआम करतो”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या वर्षी महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतरावेळी देवेंद्र फडणवीस राजकीय बैठकांसाठी वेश बदलून जात असत, असा खुलासा खुद्द फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीच केला होता. त्यावर बरीच चर्चाही झाली होती. उद्धव ठाकरेंनी आज केलेलं विधान त्याच संदर्भात असल्याचं बोललं जात आहे.