शिवसेनेचा पक्ष निधी उद्धव ठाकरे यांनी एका दिवसात दुसऱ्या खात्यात वळवला असा आरोप शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. शिवसेना भवनावर आम्ही दावा करणार नाही हे आम्ही सांगितलं होतं. शिवसेना भवन हे आमच्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी उभारलेलं मंदिर आहे. आम्ही त्यावर कधीही हक्क सांगणार नाही. तसंच निधीशीही आम्हाला काही घेणंदेणं नाही इतकं स्पष्ट सांगूनही उद्धव ठाकरेंनी एक दिवसात दुसऱ्या खात्यात निधी का वळवला? असा प्रश्न संजय शिरसाट यांनी विचारला आहे.आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारे आहोत आम्हाला निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि चिन्ह दिलं ते याचमुळे असंही संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत संजय शिरसाट यांनी हे वक्तव्य केलं आहे.
निवडणूक आयोगाचा निर्णय उद्धव ठाकरेंच्या विरोधात
निवडणूक आयोगाने मागच्या आठवड्यात शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे याना दिलं आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि निवडणूक आयोगाचा निर्णय हा कसा चुकीचा आहे आणि मनमानी करणारा आहे हे सांगितलं. तसंच १६ आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे यासंबंधीचा निर्णय लागल्यानंतरच निर्णय दिला जावा अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केली होती. मात्र निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला. त्यानंतर ठाकरे गटाने या निर्णयावर कडाडून टीका केली आहे. तसंच उद्धव ठाकरे हे आक्रमकही झाले आहेत. अशात आता संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा पक्ष निधी उद्धव ठाकरेंनी एका दिवसात दुसऱ्या खात्यावर वळवल्याचा आरोप केला आहे. या आरोपाला आता उद्धव ठाकरे काही उत्तर देणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या हातून शिवसेना निसटली अशी चर्चा होत असताना उद्धव ठाकरे मात्र चांगलेच आक्रमक झालेले पाहण्यास मिळत आहेत. निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आणि सगळी आशा आता सुप्रीम कोर्टाच्या निकालावर आहे असं म्हटलं सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रातल्या सत्तापेचावर सुनावणी सुरू आहे. सुनावणीचा आज दुसरा दिवस आहे अशात आता उद्धव ठाकरेंनी हे आवाहन केलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाचा निकाल आल्याच्या दुसऱ्या दिवशीही मातोश्रीच्या बाहेर येत आणि जीपवर उभं राहून उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित केलं होतं आणि घाबरू नका, खचून जाऊ नका आपल्याला सगळी सुरूवात पहिल्यापासून करायची आहे असंही त्यांनी म्हटलं होतं.