शिंदे गट बाहेर पडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. त्यांच्याबरोबर असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना व आमदार-खासदारांना हाताशी घेऊन उद्धव ठाकरे पक्षात नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती, कार्यकर्ते जोडणं व महाराष्ट्राच्या विविध भागांचे दौरे करणे या गोष्टी करत असताना नगर जिल्ह्यात ठाकरे गटासमोर मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे. पक्षाचे जिल्ह्यातील प्रमुख नेते व माजी मंत्री बबनराव घोलप नाराज असल्याचं दिसून येत असून त्यावर खुद्द घोलप यांनीच खुलासा केला आहे.

नेमकं घडलं काय?

शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी गेल्या महिन्यात काँग्रेस-भाजपा असा प्रवास करत पुन्हा ठाकरे गटात घरवापसी केली. २०१४ साली त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, त्यानंतर सलग दोन निवडणुकांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, वाकचौरेंच्या प्रवेशामुळे शिर्डीतील माजी मंत्री बबनराव घोलप नाराज झाले आहेत.

“मी उद्धव ठाकरेंना हेही म्हणालो की…”

वाकचौरेंच्या प्रवेशाआधी आपल्याला उद्धव ठाकरेंनी शिर्डी मतदारसंघाचं काम पाहायची जबाबदारी दिली होती, असा दावा घोलप यांनी टीव्ही ९ शी बोलताना केला आहे. “मलाही काही कळत नाहीये. सगळं व्यवस्थित असताना हे अचानक का घडलं? मी काही मागितलं नव्हतं. मला स्वत:हून उद्धव ठाकरेंनी बोलवून माझ्यावर जबाबदारी टाकली होती. तुम्ही शिर्डी मतदारसंघ सांभाळा असं ते म्हणाले होते. मी त्यांना हेही म्हटलं होतं की मला एक अडचण आहे आणि ती दूर होईल अशी अपेक्षा आहे. कारण उच्च न्यायालयात मी बाजू मांडतो आहे. तसं काही झालं नाही, तर माझा मुलगा योगेश आहे”, असं बबनराव घोलप म्हणाले.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या आश्वासनानंतरही ओबीसी मोर्चावर ठाम का आहेत? शिंदे, फडणवीस…

“स्थानिक पदाधिकारी काम करत नव्हते”

“सगळं व्यवस्थित चाललं होतं. मी तिथे कामाला लागलो. त्यानंतर मला दोन दिवसांनी पुन्हा संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी दिली. तेही काम व्यवस्थित केलं. तिथले जे काही पदाधिकारी १०-१५ वर्षं पदावर होते, काम करत नव्हते ते सुरळीत व्हावं यासाठी मी तिथे शाखा उद्घाटन करणे, कार्यकर्त्यांच्या निवडणुकांना वाव मिळावा या दृष्टीने माझं काम सुरू झालं.नगर जिल्ह्यात कधीच शिवसेनेनं बाजार समिती लढवली नाही. आता आमचे प्रत्येक बाजार समितीत एक-दोन सदस्य निवडून आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही कार्यकर्त्यांना निवडून आणण्याचा मी प्रयत्न करणार होतो. लोकसभा एवढंच माझं ध्येय नव्हतं. शिवसेना वाढली पाहिजे यासाठी मी प्रयत्न करत होतो”, असं ते म्हणाले.

मिलींद नार्वेकरांवर घोलप यांचा आरोप

दरम्यान, या सगळ्यासाठी मिलींद नार्वेकरच जबाबदार असल्याचं घोलप म्हणाले आहेत. “वर्षभर सगळं व्यवस्थित चाललं. पण अचानक मिलींद नार्वेकरांनी पुढाकार घेतला आणि वाकचौरेंना प्रवेश दिला. जु्न्या पदाधिकाऱ्यांना बोलवून घेतलं. उद्धव ठाकरेंचा दौरा लावला. मला डावलण्यात आलं. त्या दौऱ्यात वाकचौरेला पुढे-पुढे करणं हे चित्र मला योग्य वाटलं नाही. या सगळ्याला मिलींद नार्वेकर जबाबदार आहे. वाकचौरेचा प्रवेश झाला तेव्हा मातोश्रीवर कुणीही नव्हतं. तो एकटाच होता. त्याच्या माध्यमातूनच हे सगळं झालंय. त्यानं तसं मान्यही केलंय”, असा दावा घोलप यांनी केला आहे.

Supreme Court Hearing: “…तर ‘शिवसेना’ शिंदे गटाला देण्याचा निर्णय रद्द होईल”, घटनातज्ज्ञांनी मांडलं गणित; वाचा सविस्तर

“मी संजय राऊतांना सगळं सांगितलं. त्यांनाही ते पटलं. पण अजून मला पुढचा काही निरोप आलेला नाही. मी शक्यतो चुकत नाही. तुम्ही असं जर माझ्यावर बालंट टाकणार असाल, तर माझी जबाबदारी काढण्याचा निर्णय घेण्याइतका माझा दोष काय आहे?” असा सवाल घोलप यांनी केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मला दुसऱ्या पक्षात जायचं असतं तर…”

“मी शिवसेना सोडलेली नाही. मी आजही कार्यक्रमाला, मीटिंगला बोलवलं तर जातो. माझं म्हणणं एवढं आहे की जे घडलं त्यावर मातोश्रीनं मला उत्तर द्यायचं आहे. मला एकतर पक्षातून काढून टाकावं किंवा स्वीकारायचं असेल, तर माझे दोष काय होता ते मला कळलं पाहिजे. माझ्या कोणत्याही अपेक्षा नाहीत. मला दुसऱ्या पक्षात जायचं असतं, तर केव्हाच गेलो असतो”, असं ते म्हणाले.