ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाच्या महत्त्वाकांक्षेसाठी भाजपाला अडचणीत आणलं. त्यांची दुकानदारी बंद होण्याची वेळ आली आहे, असं सूचक वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केलं. त्या पिंपरी चिंचवड येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या, “देवेंद्र फडणवीसांची दुकानदारी बंद होण्याची वेळ निश्चितपणे आली आहे. त्यांनी प्रचंड कूटनीतीने स्वत:च्या व्यक्तिगत मुख्यमंत्रीपदाच्या महत्त्वाकांक्षेसाठी स्वत:चा पक्ष आणि पक्षाची प्रतिष्ठाही पणाला लावली. त्यांनी भाजपालाही अडचणीत आणलं. आजच्या घडीला फडणवीसांमुळे भाजपाची कमालीची नकारात्मक छबी निर्माण झाली आहे. त्यामुळे आता इंडिया आघाडी नक्कीच त्यांचं दुकान बंद करणार आहे.”

हेही वाचा- मनातील मुख्यमंत्री कोण? अजित पवार, फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी घेतलं एकाच नेत्याचं नाव, म्हणाले…

त्याचं धरणातील तीर्थ डोळ्याला लावून पवित्र झाले- सुषमा अंधारे

ज्या देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यावर ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. अजित पवार यांच्यावर वारंवार टीका केली. धरणग्रस्त वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस बोलले. त्याच धरणातील पवित्र तीर्थ डोळ्याला आणि डोक्याला लावून ते पवित्र झाले, असा सणसणीत टोलाही सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

हेही वाचा- “अजित पवारांचे सर्व अधिकार काढून…”, फडणवीसांच्या नियंत्रणाबाबत एकनाथ खडसेंचं मोठं विधान

अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या काळात जी भाजपा होती. त्या भाजपाचं केंद्र सरकारमधील नेत्यांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्वरूप बदलल असून भाजपा हे आता भाड्याने जमवलेला पक्ष बनला आहे, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.