राज्यात सध्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची जोरदार चर्चा आहे. अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस शिल्लक असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या तीन दिवसांसाठी विरोधकांना विजय वडेट्टीवार यांच्या रुपाने विरोधी पक्षनेता मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर शेवटच्या दोन दिवसांत विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. एकीकडे विधिमंडळात विरोधक आक्रमक दिसत असताना दुसरीकडे बाहेरही विरोधकांनी सरकारवर टीका चालूच ठेवली आहे. ठाकरे गटाकडून सामना अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर परखड शब्दांत हल्लाबोल करण्यात आला आहे.
“अशी वेळ समृद्धी महामार्गावर वारंवार का येतेय?”
“ज्या समृद्धीच्या वल्गना या महामार्गाच्या निर्मात्यांनी केल्या ती समृद्धी कधी येणार, हे कोणीच सांगू शकत नाही, परंतु या महामार्गावरील अपघात, दुर्घटना आणि निरपराध्यांच्या बळींमध्ये मात्र दिवसेंदिवस ‘वृद्धी’च होत आहे. क्रेन कोसळण्याच्या दुर्घटनेची चौकशी करण्याचा सोपस्कार राज्य सरकारने केला आहे. नुकसान भरपाई जाहीर केली आहे. राज्यकर्त्यांनी दुःख वगैरे व्यक्त केले, पण अशी वेळ समृद्धी महामार्गाबाबत वारंवार का येत आहे, याचा विचार तुम्ही कधी करणार आहात?” असा सवाल ठाकरे गटाकडून उपस्थित करण्यात आला आहे.
“दबाव व घिसाडघाईने २० कामगारांचा मृत्यू झाला”
“नावात समृद्धी असलेल्या महामार्गाबाबत ही परिस्थिती ना सरकारसाठी भूषणावह आहे ना जनतेसाठी सुखावह, परंतु तरीही महामार्गाचे उर्वरित २०० किलोमीटर कामाचे घोडे पुढे दामटले जात आहे. सरलांबे येथील पुलाचे उरलेले २० टक्के काम पुढील महिनाअखेर पूर्ण करण्याचे ‘टार्गेट’ कंत्राटदार कंपन्यांना दिले गेले आहे. त्यामुळे रात्रंदिवस, पावसाळी वातावरणातही या पुलाचे काम सुरूच आहे. याच दबावाने आणि घिसाडघाईने २० निरपराध कामगारांचा हकनाक बळी घेतला. त्यांच्या कुटुंबांना उघड्यावर पाडले”, अशा शब्दांत अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे.
“मी पहिल्या दिवसापासून म्हणत आलोय की…”; BMC तील घोटाळ्यांप्रकरणी आदित्य ठाकरेंचे सरकारवर टीकास्र…
‘समृद्धी’ महामार्ग हा म्हणे सध्याच्या राज्यकर्त्यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे. असेलही, पण तुमचे हे ‘स्वप्न’ निरपराध्यांसाठी ‘काळस्वप्न’ ठरत आहे, त्याचे काय? राज्यकर्त्यांनी समृद्धीच्या महामार्गाचे स्वप्न जरूर पाहावे, पण निरपराध्यांचे रक्त आणि त्यांच्या कुटुंबीयांचे अश्रू यामुळे जर तुमचा हा महामार्ग सतत भिजत असेल तर त्याला ‘समृद्धी’ कशी म्हणणार? अपघातग्रस्त समृद्धी महामार्गाने उपस्थित केलेला हा जळजळीत सवाल आहे. या महामार्गाचे कर्ते-धर्ते हेच आज राज्याचे मुख्य आणि उपमुख्य आहेत. त्यांच्याकडे या प्रश्नाचे काय उत्तर आहे?” असा सवाल ठाकरे गटानं उपस्थित केला आहे.
“सरकार म्हणून तुमची जबाबदारी आहे की नाही?”
“या महामार्गावर आतापर्यंत झालेल्या छोटय़ा-मोठय़ा अपघातांची, त्यातील मृत्यूंची नैतिक जबाबदारी सरकार म्हणून तुमचीही आहे की नाही? त्याचे काय प्रायश्चित्त तुम्ही घेणार आहात? की फक्त अपघात झाला, दुर्घटना झाली की, उसासे टाकायचे, मृत आणि त्यांच्या वारसांच्या नावाने ‘नक्राश्रू’ ढाळायचे, नुकसान भरपाईची तात्पुरती मलमपट्टी लावायची एवढेच करणार आहात?” असाही सवाल करण्यात आला आहे.