Uddhav Thackeray On Bihar Election Result 2025 : बिहार विधानसभेच्या निवडणुकीत एनडीएने तब्बल २०२ जागा जिंकत मोठा विजय मिळवला, तर विरोधकांच्या महाआघाडीला फक्त ३५ जागांवरच समाधान मानावं लागलं. त्यामुळे बिहार निवडणुकीत महाआघाडीला मोठा धक्का बसला आहे. बिहार निवडणुकीच्या निकालावर राजकीय वर्तुळातून आता प्रतिक्रिया येत आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज माध्यमांशी बोलताना बिहारच्या निवडणुकीबाबत भाष्य केलं. ‘ज्यांच्या सभेला खुर्च्या रिकाम्या होत्या त्यांचं सरकार आलं’, अशी खोचक प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
“असं आहे की आपले मुख्यमंत्री म्हणाले की जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनण्यामागचं राज आजपर्यंत कोणी समजू शकलेलं नाही. बिहारच्या निवडणुकीत जे जिंकले त्यांचं अभिनंदन. मात्र, एका गोष्टीचं मला आश्चर्य वाटतं की तेजस्वी यादव यांच्या सभेला जो मिळणारा प्रचंड प्रतिसाद होता, मग तो प्रतिसाद खरा होता की एआयने तयार केलेली माणसे होती, हे आता कळेना झालंय. म्हणजे ज्यांच्या सभेला अलोट गर्दी होते, त्याचं सरकार न येता ज्यांच्या सभेला खुर्च्या रिकाम्या असतात त्यांचं सरकार येतंय. या नवीन लोकशाहीतील हे गणित कळण्याच्या पलिकडचं आहे”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
महिलांना १० हजार देण्याच्या फॅक्टर परिणाम झाला का?
बिहारमध्ये महिलांना १० हजार रुपये देण्याच्या योजनेच्या फॅक्टरबाबत प्रश्न विचारला असता यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, “हा एक फॅक्टर झाला. याचा कदाचित काहीसा फरक पडलाही असेल. पण तेथील लोक ज्या समस्या भोगत आहेत, ते एवढ्या लवकर बदलतील असं वाटत नाही. पण आता ठिक आहे की, जो जीता वही सिकंदर”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला.
बिहार निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?
भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्त्वाखालील एनडीएने २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत उत्कृष्ट कामगिरी केली. बिहार निवडणुकीचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले. यामध्ये एनडीएने २४३ पैकी २०२ जागा जिंकत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली. एनडीएने जिंकलेल्या २०२ जागांपैकी भाजपाला ८९ जागांवर विजय मिळाला, तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने ८५ जागा जिंकल्या. या दोन्ही पक्षांनी प्रत्येकी १०१ जागा लढवल्या होत्या. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाने (रामविलास) लढवलेल्या २९ जागांपैकी १९ जागा जिंकल्या, जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्थानी अवाम मोर्चाने ५ जागा जिंकल्या तर राष्ट्र लोक मोर्चाने ४ जागा जिंकल्या. तसेच महाआघाडीला अवघ्या ३५ जागांवर समाधान मानावं लागलं.
