राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण तापलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प जाहीर करताना त्यामध्ये काही जातनिहाय महामंडळे स्थापन करण्याचा केलेला उल्लेख चर्चेत आला आहे. याच मुद्द्यावरून ठाकरे गटाने शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्र सोडलं आहे. “एखाद्या समाजास देण्यासारखे काही नसले की, सरकार त्यांना एखादे महामंडळ काढून देते”, असं म्हणत ठाकरे गटानं सरकारच्या या निर्णयावर कठोर शब्दांत आक्षेप घेतला आहे. तसेच, बाळासाहेब ठाकरेंच्या धोरणाचीही आठवण करून दिली आहे.

“…पोटाला जात नसते हे बाळासाहेबांनी यासाठीच सांगितलं”

“ज्या जातीने मागितले त्यांना व ज्यांनी मागितले नाही त्यांनाही महामंडळाच्या रूपाने रेवडय़ा वाटल्या आहेत. आता तर ब्राह्मणांसाठीही महामंडळाचा प्रस्ताव असल्याचे फडणवीस सरकारने स्पष्ट केले. ब्राह्मण, सी. के. पी. वगैरे खुल्या प्रवर्गातील समाजाची नाराजी दूर करण्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याचे समोर आले. आज महाराष्ट्रात ‘जातीच्या विरोधात जात’ अशा उभ्या राहिल्या आहेत की छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र तो हाच काय? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही”, अशा शब्दांत ‘सामना’तील अग्रलेखातून सरकारला लक्ष्य करण्यात आलं आहे.

“…याची उपरती सरकारला कसब्यातल्या पराभवाने झाली”

“ब्राह्मणांसाठी स्वतंत्र महामंडळ काढून या वर्गाच्या हाती नेमके काय लागणार आहे? ब्राह्मणांतील दुर्बलांना आर्थिक सवलतींचे लाभ मिळावेत, शिक्षणात राखीव जागा मिळाव्यात ही उपरती राज्य सरकारला आता झाली. त्याचे कारण कसब्यातील दारुण पराभवात आहे काय? अर्थात कसब्यातील १३ टक्के ब्राह्मण वर्गापैकी ज्यांनी भाजपास मतदान केले नाही त्यांच्या नाराजीची कारणे नक्की काय, त्याचा शोध घेतला म्हणजे सत्य बाहेर येईल”, अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.

“कसब्यात जाती झुगारून मतदान झालं, पण…”

“आतापर्यंत कसब्यात गिरीष बापट, मुक्ता टिळक विनासायास निवडून येतच होत्या व ब्राह्मणांबरोबर इतर बहुजन समाजाचे मतदान त्यांना होत असे, याचाही विसर पडू नये. कसब्यात ‘ब्राह्मण’ म्हणून एक अपक्ष उमेदवार उभे राहिले त्यांना सर्व मिळून पाचशेही मते पडली नाहीत व ब्राह्मणांसाठी महामंडळ असावे या मागणीचा पाठपुरावा हेच ‘ब्राह्मण’ उमेदवार करीत होते. याचा नेमका अर्थ कसब्याने जातीय दृष्टिकोनातून मतदान केले नाही. जाती झुगारून तेथे मतदान झाले. पण कसब्यातील ब्राह्मण वर्ग नाराज असल्याचे मानून सरकार ब्राह्मण महामंडळाची हालचाल करीत आहे”, असंही यात नमूद करण्यात आलं आहे.

सुभाष देसाईंच्या मुलाने शिंदे गटात प्रवेश का केला?, स्वत: सांगितलं कारण; म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“बाळासाहेबांची जात सीकेपी होती हे कधीच…”

“मराठी माणसांसाठी शिवसेनेची ठिणगी टाकणाऱ्या बाळासाहेबांची जात ‘सीकेपी’ होती हे कधीच कुणाला माहीत नव्हते. कर्तृत्व हे जातीवर कधीच अवलंबून नसते. शौर्यालाही जात-धर्म नसतो, पण राजकारणात सध्या जातीला व धर्माला जे महत्त्व मिळू लागले ते पाहता देशात सामाजिक विघटनास सुरुवात झाली आहे, असेच म्हणावे लागेल. महाराष्ट्राच्या मंत्रालयात जातीनिहाय मंत्रालये व महामंडळे स्थापन करण्यामागे फक्त राजकीय लाभाचे गणित आहे”, असं म्हणत ठाकरे गटानं सरकारच्या निर्णयावर तोंडसुख घेतलं आहे.