शिवसेनेतील बंडखोरी आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सक्रिय झाले आहेत. आज त्यांनी हिंगोलीत निर्धार सभा घेतली. हिंगोली हा आमदार संतोष बांगर यांचा मतदारसंघ. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर संतोष बांगर ठाकरेंच्या बाजूने होते. डोळ्यांत अश्रू आणत त्यांनी शिंदेंना माघारी बोलावलं होतं. परंतु, आयत्या वेळेला संतोष बांगरच शिंदे गटाकडे गेले. तिकडे गेल्यावर बांगरांनी ठाकरेंवर सातत्याने टीका केली आहे. आज त्यांच्याच मतदारसंघात जाऊन उद्धव ठाकरेंनी शिंदे गट आणि भाजपावर निशाणा साधला आहे. तसंच, मिश्कील शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली आहे.

हेही वाचा >> उद्धव ठाकरेंची हिंगोलीतून भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना साद, म्हणाले “सतरंज्यांवर उपरे नाचताहेत…”

“मी कोणाला काही वाईट बोलत नाही. देवेंद्र फडणवीसांवर तर मी बोलायचंच सोडून दिलंय. मी काहीही म्हटलं तरी त्याचा बोभाटा होतो’, असं उद्धव ठाकरे म्हणाले. “मी आधी एकदा त्यांना फडतूस बोललो होतो, आता नाही बोलणार. एकदा कलंक बोललो होतो, आता नाही बोलणार. आता थापाड्या बोलायचं होतं, पण आता नाही बोलणार. कारण मी काही बोलायचं ठरवलं तरी त्याचा बोभाटा होतो. पण ते राज्यात दुष्काळ पडला असताना जपानला गेले”, असं ठाकरे म्हणाले. ठाकरेंचे हे उद्गार ऐकताच सभास्थळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. ठाकरेंच्या नावाचा जयघोष करण्यात आला.

हेही वाचा >> “गद्दाराला नाग समजून पूजा केली, पण…”, उद्धव ठाकरेंचा संतोष बांगरांवर हल्लाबोल

तेवढ्यात उद्धव ठाकरेंनी पुन्हा टीका केली. “टरबुजाच्या झाडालासुद्धा पाणी लागतं”, असं ठाकरे म्हणाले. असं म्हणताच ते पुढे “मी असं काही म्हणत नाही. अजिबात म्हटलेलं नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आता ते जपानला गेले होते. चांगली गोष्ट आहे की कोणालातरी वाटलं की राज्यात उद्योगधंदे आले पाहिजे. इकडे दुष्काळ पडलेला असतानाही जपानला गेले, तिकडे डॉक्टरेट घेतली. तुमचा हा प्रयत्न स्तु्त्य आहे. कलंक, फडतूस वगैरे बोलणार नाही. पण महाविकास आघाडीच्या काळात जे उद्योगधंदे राज्यात आले होते, जे उद्योग राज्याच्या उंबरठ्यावर होते, ते तुमच्या डोळ्यांदेखत राज्याच्या बाहेर गेले”, अशी टीकाही ठाकरेंनी केली.