काँग्रेस-सेना वादात चौदा जण जखमी
कणकवली येथे शिवसैनिक व पोलिसांमध्ये आमने-सामने झालेल्या राडय़ातील जखमी शिवसैनिकांना भेटण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोमवारी कणकवलीला रवाना झाले. शिवसेना व काँग्रेसमधील वादातून झालेल्या या राडय़ात चौदा पोलीस व शिवसैनिक जखमी झाले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील राजकीय वर्चस्वातून नारायण राणे यांना एकीकडे राष्ट्रवादीचा तर दुसरीकडे शिवसेनेचा सामना करावा लागत आहे. त्यातच गेले काही दिवस काँग्रेस व शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या धुसफुशीनंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष वैभव नाईक यांना वादावादीचे जाहीर आव्हान दिले.
कणकवलीतील मराठा मंडळ सभागृहात होणाऱ्या या वादावादीचे स्वरूप पाहून पोलिसांनी नाईक यांना अटकाव केला. परंतु एकीकडे शिवसैनिक आक्रमक होत असतानाच दगडफेक करण्यात आल्यामुळे पोलिसांनी लाठीमार केला. यात अनेक शिवसैनिक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या जखमी शिवसैनिकांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, आमदार सुभाष देसाई यांच्यासह शिवसेनेचे नेते सोमवारी सायंकाळी कणकवलीला रवाना झाले. पोलिसांच्या या बेछुट लाठीमारामागे नारायण राणे यांचा हात असल्याचा आरोप सेनानेत्यांनी केला असून राणे यांची दादागिरी कोकणातून पूर्ण संपवू, असे संजय राऊत यांनी सांगितले.