Devendra Fadnavis And Uddhav Thackeray Meet: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मिश्कीलपणे “सत्ताधारी पक्षात येण्याचे” आमंत्रण दिले होते. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. ही भेट विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या कार्यालयात झाली. त्यांची ही भेट सुमारे २० मिनिटे चालली.

दरम्यान शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) एक्स अकाउंटवर या भेटीबाबत माहिती देण्यात आली आहे. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आज विधानभवन येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील विविध संपादकांनी हिंदीसक्तीविरोधात लिहिलेल्या लेखांचे संकलित ‘हिंदी हवी कशाला?’ पुस्तक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना भेट दिले.”

काय होती देवेंद्र फडणवीसांची ऑफर?

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा विधानपरिषदेतील कार्यकाळ येत्या काही दिवसांत संपणार आहे. त्यांचे या टर्ममधील हे शेवटचे अधिवेशन असल्यामुळे काल त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. य निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्री, तसेच विरोधी पक्षांतील उद्धव ठाकरे आणि इतरांनी भाषणे केली.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून, “अंबादास दानवे यांनी पुन्हा सभागृहात आल्यानंतर याच पदावर काम करावे, असे काही नाही. आता मी असे म्हटलो की, उद्धवजी म्हणतील, आम्ही पळवा, पळवी करतो.”

मुख्यमंत्र्यांनी हे विधान करताच समोरच्या बाकावरून उद्धव ठाकरे यांनी काहीतरी टिप्पणी केली. यावर फडणवीस म्हणाले की, “उद्धवजी २०२९ पर्यंत तरी आम्ही त्याबाजूला (विरोधी बाकावर) येण्याचा काहीच स्कोप नाही. पण तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप आहे. त्यावर विचार करता येईल. त्याचा विचार वेगळ्या पद्धतीने करता येईल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या ऑफरबाबत काल उद्धव ठाकरे यांना माध्यमांनी प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांनी भूमिका स्पष्ट केली. याबाबत बोलताना ते म्हणाले, “हा प्रश्न नुसता बाकाचा नाही तर प्रसंग बडा बाका आहे. सभागृहात काही गोष्टी खेळीमेळीने होत असतात. त्या खेळीमेळीने घ्यायला हव्यात.”