मध्य प्रदेशात भाजपाचे सरकार आल्यास भाविकांना रामलल्लाचे मोफत दर्शन घडवण्यात येईल, असं विधान गृहमंत्री अमित शाह यांनी केलं होतं. यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमित शाह आणि भाजपावर हल्लाबोल केला आहे. प्रभू श्री राम तुमची मालमत्ता आहे का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपाला उपस्थित केला आहे. तसेच, केंद्रात आमचं सरकार येणार आणि आणणारच, असा निर्धारही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.

मीरा भाईंदर येथील गोवर्धन पूजा समारोह सोहळ्यात उद्धव ठाकरेंनी उपस्थितांना संबोधित केलं. उद्धव ठाकरे म्हणाले, “मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील निकाल सर्वांसमोर आहेत. पण, मध्य प्रदेशात प्रचारावेळी अमित शाहांनी म्हटलं की, ‘आम्हाला मतदान करा, तुम्हाला प्रभू श्री रामाचे दर्शन मोफत घडवू.’ प्रभू श्री राम तुमची मालमत्ता आहे का?”

“शिवसेना अन् भाजपाच्या हिंदुत्वात हाच फरक आहे”

“तुम्हाला वाटतं ‘जय श्री राम’ आणि ‘बजरंगबली की जय’ म्हटल्यानं सगळे हिंदू तुमच्याबरोबर येतील. मात्र, शिवसेना आणि भाजपाच्या हिंदुत्वात हाच फरक आहे. हृदयात राम आणि हाताला काम देणारं आमचं हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व दुसऱ्या धर्माचा द्वेष करत नाही,” असं उद्धव ठाकरे म्हटलं.

“महाराष्ट्राची प्रगती झाली, तर देशाची प्रगती होत नाही का?”

“मुंबईतील उद्योग गुजरातला घेऊन जात आहेत. मुंबईतील लोकांनी तिकडे जायचं का? ‘गुजरातची प्रगती झाली, तर देशाची प्रगती होईल,’ असं पंतप्रधान म्हणतात. मग, महाराष्ट्राची प्रगती झाली, तर देशाची प्रगती होत नाही का? गुजरातची प्रगती करण्यासाठी आमचं हिसकावून घेऊन जाऊ नका,” असंही उद्धव ठाकरेंनी ठणकावलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आपलं धनुष्यबाण चोरलं”

“आजपर्यंत ज्यांना आपलं समजलं, तेच आता शत्रू बनून समोर उभे राहिलेत. आपलं धनुष्यबाणही चोरलं आहे,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.