Uddhav Thackeray : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर टीका करत मतदान प्रक्रियेत घोळ झाल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यांच्या आरोपामुळे देशभरात एकच खळबळ उडाली. मतदान प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत राहुल गांधी यांनी काही पुराव्यांचं सादरीकरण केलं होतं. दरम्यान, राहुल गांधींच्या या आरोपानंतर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर टीका केली आहे. तसेच काही सवाल देखील विचारले आहेत. निवडणूक आयोगावर आरोप केले आहेत, मग सरकार आणि भाजपा मध्ये का पडतंय?, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
“सरकारने स्वत:च्याच हाताने लोकशाहीला काळ फासलं आहे. ही लढाई निवडणूक आयोगाबरोबर आहे. मात्र, त्यात भाजपा आणि सरकार का पडतंय? हे आता उघड झालं आहे. कशा पद्धतीने मतांची चोरी झाली याचं सहप्रमाण राहुल गांधींनी दाखवून दिलं आहे. तसेच याबाबत पत्रकार परिषद देखील त्यांनी घेतली. मात्र, त्यानंतरही निवडणूक आयोग त्यांना सांगत आहे की शपथपत्र द्या. मग हा कोणता उलटा कारभार आहे?”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
“आता बिहारमध्ये लाखो मतदारांची नावं वगळण्यात येत आहेत. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाला निवडणूक आयोग सांगत आहे की ज्या मतदारांची नावे ओघळली त्यांची यादी तुम्हाला द्यायला आम्ही बंधनकारक नाहीत. मला आता एक प्रश्न विचारायचा आहे की सर्वोच्च न्यायालयापेक्षा निवडणूक आयोग किंवा निवडणूक आयुक्त मोठे आहेत का? निवडणूक आयुक्त हे पद सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठं पद आहे का? मला वाटतं की हा सर्वोच्च न्यायालयाचा अपमान आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेतं? ते आम्हाला देखील पाहायचं आहे. लोकशाहीची ही लढाई तुम्ही चिरडून टाकण्याचा प्रयत्न करत आहात”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
“आताची जागतिक परिस्थिती पाहिली तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प जी धमकी देत आहेत, ते देशावरचं संकट आम्ही मानतो. तसेच पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील सर्व विरोधी पक्ष आम्ही एकजुटीने सरकारबरोबर उभे राहिलो. तसं पंतप्रधान मोदींनी देशातील सर्व विरोधी पक्षांना बोलवून सर्वांना विश्वासात घेऊन देशासाठी आपण काय करू शकतो? हे विचारण्याची गरज होती. मात्र, तसं न करता झालेली मतचोरी कशी लपवता येईल? यासाठी सरकार आटापिटा करत आहे”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
“देशातील सर्व जनतेला मी आवाहन करतो की सध्या जे काही सुरू आहे ते तुम्हाला पटतंय का? त्यामुळे तुम्ही ज्या-ज्या ठिकाणी जाल, तेथे या भ्रष्ट्राचाराबाबत चर्चा करा, लोकांना समजावून सांगा. या मतांच्या चोरीमुळे आपल्याला फटका बसला. आता ते बिहारमध्ये लोकांना सांगत आहेत की तुमची ओळख पटवून द्या. सध्या जी मते विरोधात आहेत, त्या मतांची छाटणी करायची आणि आपली मते वाढवायची. म्हणजे हा लोकशाहीवरचा दरोडा आहे”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.