शिवसेना (ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’त मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी देशासह राज्यातील राजकारणावर आपलं मत व्यक्त केलं. तसेच सध्या राज्याच्या राजकारणात सुरू असेल्या घडामोडींबाबतही त्यांनी परखड मत मांडलं. याचबरोबर मनसेबरोबरील युतीच्या संदर्भातील चर्चेंवरही मुलाखतीत त्यांनी सूचक विधान केलं. खरं तर त्यांच्या या विधानाची आता चर्चाही रंगली आहे. तसेच भारतीय जनता पक्ष लोकसभेच्या निवडणुकीत बहुमत का मिळवू शकला नाही? लोकसभेच्या निवडणुकीत मोदींना बहुमत गमावण्याची वेळ का आली? याबाबतचे काही कारणंही उद्धव ठाकरे यांनी सांगितली आहेत.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

महाराष्ट्रात सध्या खूप घडामोडी सुरु आहेत. देशात आणि महाराष्ट्रात जे सुरू आहे त्याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची मन की बात काय आहे? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला. यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, “तुम्ही म्हणालात की वेगवेगळ्या प्रकारचे वारे, पण या वाऱ्यांमध्ये काही हवेचे फुगे देखील आहेत. म्हणजे ते फुगे काही काळ वरती जातात आणि त्यातील हवा निघून गेली की ते खाली पडतात. असे काही फुगे सध्या तरंगत आहेत ते फुगे म्हणजे काही वारे नाहीत”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

‘आता राजही (राज ठाकरे) सोबत…’, उद्धव ठाकरे

“तुम्ही जो ठाकरी वाऱ्यांचा विषय काढला, तर हे ठाकरी वारे नाहीत. आमची पाने, मुळे हे गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्राच्या मातीत रुजलेले आहेत. अगदी जास्त पिढ्यांचा उल्लेख नाही केला तरी माझ्या आजोबांपासून ते शिवसेना प्रमुख (बाळासाहेब ठाकरे) आणि त्यानंतर मी (उद्धव ठाकरे), आदित्य ठाकरे आणि आता राजही (राज ठाकरे) सोबत आलेला आहे. सदा सदासर्वदा ठाकरे म्हणजे एक संघर्ष. हा संघर्ष एका मतलबी वाऱ्यासाठी नाही, तर समाजाच्या हितासाठी आम्ही हा संघर्ष करत आलेलो आहोत”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

“आम्ही सत्तेत किती काळ राहिलो? यापेक्षा आम्ही संघर्ष करत आलेलो आहेत. त्यामुळेच हा जो काही ठाकरे ब्रँड हा आम्ही बनवलेला नाही, लोकांनी बनवलेला आहे. कारण लोकांना माहिती आहे की ठाकरे हे प्रामाणिक आहेत, स्वार्थी नाहीत. जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडणारे आहेत. त्यामुळे आज एवढे वर्ष महाराष्ट्रातील जनता आमच्या बरोबर राहिली आहेत”, असंही ते म्हणाले.

ठाकरे ब्रँड राजकारणात ५० वर्षांपेक्षा जास्त कसा टिकून राहिला?

जगात व्यवसायात किंवा उत्पादनात अनेक मोठमोठे ब्रँड एकमेकांना संपवण्यासाठी संघर्ष करतात. मात्र, तरीही ठाकरे ब्रँड हा देशाच्या राजकारणात ५० वर्षांपेक्षा जास्त काळ टिकून राहिला असं संजय राऊतांनी विचारलं असता उद्धव ठाकरे म्हणाले की, “ठाकरे फक्त ब्रँड नाही, तर मराठी माणसांची आणि महाराष्ट्रात हिंदू अस्तिमेतची ओळख आहे. ही ओळख पुसून टाकण्याचा जो कोणी प्रयत्न करेन, आजपर्यंत अनेक आले आणि अनेक गेले. पण ठाकरे ब्रँड संपला नाही. आज माझ्याकडे काही नाही. तरीही मी कुठेही गेलो तरी अतिशय प्रेमाणे स्वागत करतात, बोलतात”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“त्यांना त्यांच्या नावाशिवाय दुसरं कोणतंच नाव नको आहे. आता ते स्वत:ची तुलना देवाबरोबर करायला लागले आहेत. मग अशा लोकांबाबत आपण काय बोलणार? अशी लोकं काळाच्या ओधात येतात आणि जातात. जे पोकळ आहेत म्हणजे त्यांना आजही ठाकरे ब्रँडची मदत लागेतय, म्हणजे फक्त ब्रँडची चोराचोरी करून आणि आपण कसे ठाकरेंचे भक्त आहोत हे सांगून स्वत:चं महत्व वाढवण्याचा केविलवाणा काहींचा प्रयत्न आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता शिंदेंवर टीका केली.

काही लोकांनी मातोश्रीवर हक्क सांगितला का?

“ठाकरे हे संघर्षच करतात. त्यामुळे आमचं नाव कोणीही चोरू शकत नाही. पक्षाच नाव किंवा पक्षाचं चिन्ह ते चोरतील, पण लोकांचं आम्हाला मिळणारं प्रेम कसं चोरणार? लोकांचा जो आमच्यावर जो विश्वास आहे तो कसा चोरणार? तो विश्वास खोक्यातून विकला नाही जात”, असं ठाकरे म्हणाले. काही लोकांनी मातोश्रीवर हक्क सांगण्याचा प्रयत्न केला का? यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, “खरं तर तो त्यांच्या मातोश्रीचा अपमान आहे, कारण ते त्यांच्या स्वत:च्या मातोश्रीला मानत नाहीत.”

‘शिवसेनेचं अस्तित्व संपवू शकत नाहीत’ : उद्धव ठाकरे

ज्यांनी ठाकरे ब्रँडवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, ज्यांनी माझीच शिवसेना खरी असा भ्रम निर्माण केला. ते स्वत:ची शिवसेना भाजपात विलीन करायला निघाले आहेत याकडे तुम्ही कसं पाहता? या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले की, “कारण त्यांच्याकडे दुसरा पर्याय काय? कारण त्यांच्या गुरुपौर्णिमेचं संपूर्ण वर्णन आपण केलं आहे. आता खऱ्या शिवसेनेचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न आहे. पण ते संपवू शकत नाहीत. आता एवढे वर्ष झाले तरीही ते जनतेला माझ्यापासून तोडू शकत नाहीत. हेच त्यांचं दु:ख आहे.”

उद्धव ठाकरे यांची निवडणूक आयोगावर टीका

“मी एक गोष्ट सांगतो की शिवसेनेचं चिन्ह हे दुसऱ्याला देतील किंवा गोठतील. पण शिवसेना हे नाव ते दुसऱ्याला देऊ शकत नाहीत. कारण तो अधिकार निवडणूक आयोगाला नाही. शिवसेना हे नाव माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी दिलेलं आहे. उद्या मी निवडणूक आयुक्ताचं नाव धोंड्या ठेवलं तर? त्या धोंड्याला पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार नाही. पण त्या धोंड्याने जे केलं ते बेकायदेशीर आहे. त्या धोंड्याला शिवसेना हे नाव दुसऱ्याला देताच येत नाही. हा अधिकार त्यांना नाहीच. पण त्या धोंड्याला शेंदूर फासणारे दिल्लीत बसलेत म्हणून हे झालंय”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत मोदींवर बहुमत गमावण्याची वेळ का आली?

लोकसभेच्या निवडणुका होऊन एक वर्ष झालं. लोकसभेच्या निवडणुकीत मोदींना बहुमत मिळालं नाही. मोदींनी लोकसभेला बहुमत गमावणं तुम्ही याकडे कसं पाहता? या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले की, “तुम्ही कदाचित सर्व जणांना एकदा मुर्ख बनवू शकता. पण सर्वांना सर्वकाळ मुर्ख बनवू शकत नाहीत. मला असं वाटतं की यामध्ये सर्वच आलं. आता हळू-हळू लोक यामधून बाहेर पडायला लागले आहेत. तुम्ही १० वर्षांपूर्वी जे काही सांगितलं होतं की आम्ही एवढ्या नोकऱ्या देऊ? त्या कुठे आहेत? देशासाठी १० वर्ष खूप झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकसभेला महाराष्ट्रात महाविकास आघाडीने ३१ जागा कशा जिंकल्या?

लोकसभेच्या निवडणुकीत मोदींनी बहुमत गमावलं त्यात महाराष्ट्राची भूमिका महत्वाची आहे. पण लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीने ३१ जागा जिंकल्या हे कसं शक्य झालं? यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, “लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी खूप एकजुटीने लढली. बूथ स्तरावरील कार्यकर्ता देखील अतिशय जागृत होता. भाजपाचं धोरण हे सर्वसामान्य जनतेला नेहमी चिंताग्रस्त ठेवण्याचं धोरण आहे. तणावग्रस्त ठेवायचं, देशाच अस्थिरता ठेवायची, मग जातीपातीत असेल किंवा समाजात किंवा आर्थिक या अस्थिरतेचा दुरपयोग करून राज्य करायचं असं धोरण भाजपाचं आहे”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.