बंडळीनंतर शिवसेनेत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे समर्थक असे दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटांत सध्या कायदेशीर लढाई सुरु आहे. विधिमंडळातील एकनाथ शिंदे गटाला विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली आहे. असे असताना शिवसेनेच्या धुनष्यबाण या चिन्हासाठीही या दोन्ही गटांमध्ये न्यायालयीन लढाई होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनीदेखील नव्या चिन्हाची तयारी ठेवा, असे आदेश दिल्याची चर्चा होती. असे असताना आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धनुष्यबाण या चिन्हाविषयी मोठे भाष्य केले आहे. शिवसेनेपासून धनुष्यबाण हे चिन्ह कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा>>> Uddhav Thackeray PC : “आम्हीच खरी शिवसेना” म्हणणाऱ्या बंडखोर आमदारांना उद्धव ठाकरेंनी सुनावलं; म्हणाले, “शिवसेना ही काही…”!

“कायद्याने जे नमूद केलंय, त्यानुसार धनुष्यबाण कुणीही शिवसेनेकडून हिरावून घेऊ शकत नाही. ती चिंता सोडा. पण नुसतं धनुष्यबाणावरच लोक विचार करत नाहीत. धनुष्यबाण हाती घेतलेल्या माणसांची लक्षणंही लोक बघत असतात. ते मी शिवसैनिकांना सांगितलं. याचा अर्थ असा होत नाही की, नवीन चिन्हाचा विचार करा,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा>>> “एकनाथ शिंदे एक तास रडत होते,” बंडखोर आमदाराचा मोठा खुलासा; म्हणाले “४० वर्ष पक्षासाठी देणारी व्यक्ती ढसाढसा…”

तसेच, “नवीन चिन्हाचा विचार करण्याची गरज नाही. शिवसेनेपासून धनुष्यबाण कोणीही वेगळा करुन शकत नाही. कायदेशीर अभ्यासकांना बोलून मी हे सांगत आहे,” असेदेखील उद्धव ठाकरे म्हणाले.

पाहा व्हिडीओ –

पुढे बोलताना त्यांनी शिवसेना पक्षाला लागलेल्या गळतीबद्दलही भाष्य केलं. “या पालिकेचे काही नगरसेवक गेले, त्या पालिकेचे काही नगरसेवक गेले असे सांगितले जात आहे. मात्र सध्या पालिका अस्तित्वात नाहीत. त्यामुळे जे गेले ते शिंदे यांचे व्यक्तिगत कार्यकर्ते असू शकतात. त्यांची काही लोकं असतील ती गेली असतील. साधीसाधी लोक माझ्याकडे येत आहेत,” असे म्हणत शिवसेनेचे कार्यकर्ते शिंदे गटात सामील होत नसल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा>>> “मी ‘वर्षा’तून बाहेर पडल्यावर देवेंद्र फडणवीसांना फोन केला, ते म्हणाले..”, बंडखोर आमदार आशिष जैस्वाल यांचा खुलासा!

तसेच, “परवा शिवसेना भवनात राज्यातील सर्व महिला जिल्हाप्रमुख आल्या होत्या. त्या वाघिणीसारख्या बोलत होत्या. ज्यांच्याकडे उत्पन्नाचं साधन नाहीये, तेही लोक येत आहेत. शिवसेनेने साध्या लोकांना मोठं केलं. तोच आमच्या अभिमानाचा विषय आहे. जे लोक मोठे झाले ते गेले. पण मोठ्या मानाची आणि मोठ्या हिमतीची साधी माणसं अजूनही शिवसेनेत आहेत. त्यामुळे शिवसेनेला कोणी धोका पोहोचवू शकत नाही,” असे म्हणत शिवसेना लढाई करण्यास तयार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.