शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही गटांना अनुक्रमे मशाल आणि ढाल-तलवार ही निवडणूक चिन्हे मिळाली आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी दोन्ही गटातील या संघर्षावर थेट भाष्य केले. आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी न्यायालयात जावे लागत आहे. मैदानात या. मी तर लढाईच्या क्षणाची वाट पाहात आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ते मुंबईत छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.

हेही वाचा >>> “आता मर्द लोकांच्या हातात मशाल देण्याची गरज” नियतीचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचे विधान

आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी न्यायालयात जावं लागत आहे. दसरा मेळाव्यासाठी मैदान मिळावे म्हणून न्यायालयात जावे लागले. हिंमत असेल तर तुम्ही मैदानात या. माझी तयारी आहे. दोघे एकाच व्यासपीठावर एकाच मैदानावर येऊ. मग जी लढाई व्हायची ती होऊ द्या, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिला. शिवसेनेने अनेक वादळं अंगावर घेतली होती. मात्र शरद पवार, काँग्रेस यांच्या रुपात वादळ निर्माण करणारी लोक सोबत असल्यामुळे मी तर लढाईच्या क्षणाची वाट पाहात आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

आपल्या भाषणात त्यांनी मिश्कील टोलेबाजी करत राष्ट्रवादी आणि काँग्रेसने महाविकास आघाडीच्या रुपात सोबत राहावे, असे आवाहन केले. छगन भुजबळ यांची ही पहिलीच पंचाहत्तरी आहे. पुढच्या पंचाहत्तरीलाही सोबतच राहा. आम्हाला कार्यक्रमाला बोलवा, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच महाविकास आघाडीची सत्ता ही तुमच्या हातात आहे. नेत्याचा जयजयकार करून चालणार नाही. कार्यकर्त्यांनी सोबत यावे लागेल. ही लढाई माझ्या एकट्याची नसून सर्वांचीच आहे. ही लाढाई देशाच्या दुसऱ्या स्वातंत्र्याची आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा >>> “दबावाला बळी पडून…”, ऋतुजा लटकेंना न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर उद्धव ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार तसेच उद्धव ठाकरे गटाला मिळालेल्या मशाल या चिन्हावरही भाष्य केले. नियतीच्या मनात काय असतं हे कोणालाही माहिती नसते. आता मर्दांच्या हातात मशाल देण्याची नियतीची इच्छा आहे. प्रत्येकाचे वय वाढत असते. माणूस वयाने मोठा होत असतो. पण तो जेव्हा विचारांनी थकतो तेव्हा तो खरा वृद्ध होतो. अडीच-तीन वर्षांपूर्वी आपण एक नवे समीकरण जन्माला घातले. महाविकास आघाडीच्या रुपात आपण हे समीकरण यशस्वीपणे चालवले होते. मात्र हे पाहून एखाद्याला पोटशूळ उठणे साहजिक आहे. याच कारणामुळे आता सरकार पाडण्यात आले. सरकार पाडण्यासाठी किती खालची पातळी गाठण्यात आली, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपाला घेरण्याचा प्रयत्न केला.