Uddhav Thackeray on Eknath Shinde : मी केवळ अर्ध्या दाढीवरून हात फिरवला तर, आडवे झाले, त्यातून अजून सावरले नाहीत. आता कुणाचा तरी हात पकडून उठण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे उठेगा नहीं, हे बोलणे त्यांना शोभत नाही, असा टोला लगावत पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता तर काय झाले असते, याचा विचार त्यांनी करावा, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे (शिंदे) प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी गेल्या आठवड्यात ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केलं होतं. या वक्तव्यासह त्यांनी नामोल्लेख टाळत उद्धव ठाकरेंना टोला लगावला होता. या वक्तव्यावर आता उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ या शिवसेनेच्या (ठाकरे) मुखपत्रासाठी संपादक व राज्यसभा खासदार संजय राऊत यांना मुलाखत दिली. यावेळी ते म्हणाले, “त्यांची अर्धी दाढी तरी राहिलीय हेच नशीब समजावं. त्यांनी जास्त बोलू नये. नाहीतर लोक त्यांची बिनपाण्याने करतील. अर्धी राहिलीय ती देखील काढतील. ती दाढी महाराष्ट्रातील प्रश्न का सोडवत नाही?”
गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरही टिप्पणी
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी भाजपा नेते व मंत्री गिरीश महाजन यांच्या दाव्यावरही प्रतिक्रिया दिली आहे. ‘शिवसेना जमीनदोस्त करू’ या महाजनांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “शिवसेना जमिनीची दोस्त आहे. म्हणून तुम्ही कधीच शिवसेना संपवू शकत नाही. आमचे पाय जमिनीवर आहेत आणि या वृक्षाची मूळं खाली मातीत खोलवर रुतली आहेत. तुम्ही (भाजपा) जमिनीचे शत्रू आहात. म्हणूनच मुंबईसह सगळी जमीन मोदींच्या मित्राच्या (गौतम अडाणी) घशात घालू पाहताय. तुम्ही जमीनशत्रू आहात.”
उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदेंच्या टीकेला उत्तर
मुंबई येथील वरळी भागातील एनएससीआय डोम येथे शिवसेना (ठाकरे) व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विजयी सभा नुकतीच पार पडली. राज्यातील फडणवीस सरकारने इयत्ता पहिलीपासूनची मुलांना हिंदी भाषा शिकण्याची सक्ती करणारा निर्णय घेतला होता. मात्र, मराठी जनतेचा रोष व ठाकरे बंधूंचा आंदोलनाचा पवित्रा पाहून फडणवीस सरकारने एक पाऊल मागे घेत हिंदी सक्तीचा आदेश रद्द केला. त्यामुळे शिवसेना (ठाकरे) व मनसेने विजयी सभा घेतली होती.
या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिका केली होती. त्या टीकेला उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले होते की “दाढीवरून अर्धा हात फिरवला होता. २०२२ मध्ये आम्ही उठाव केला. अन्यायाविरुद्ध उठाव केला. तेव्हापासून ते आडवे झाले. त्यातून सावरले नाही. अजूनही आडवेच झालेले आहेत. आता कुणाच तरी हात पकडून उठण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे उठेगा नही, हे बोलणे त्यांना शोभत नाही. मनगटात जोर लागतो फक्त तोंडाच्या वाफा सोडून होत नाही.”