आशिया कप स्पर्धेत बुधवारी भारतानं यूएईविरुद्ध मोठा विजय मिळवून अ गटात आघाडी घेतली आहे. आता भारतीय संघाचा पुढचा सामना येत्या १४ सप्टेंबरला पाकिस्तानशी होणार आहे. मात्र, भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला राजकीय वर्तुळातून मोठा विरोध होऊ लागला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानं या सामन्याविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला असून येत्या १४ सप्टेंबर रोजी ‘माझं कुंकू, माझा देश’ या घोषणेनिशी हे आंदोलन केलं जाणार आहे. ठाकरे गटाचे खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी यासंदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती दिली.
काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊतांनी यावेळी भारत-पाकिस्तान सामन्याला विरोध करताना पहलगाम दहशतवादी हल्ला व ऑपरेशन सिंदूरचा दाखला दिला. “१४ सप्टेंबरला अबुधाबी येथे भारत व पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना खेळवला जात आहे. पण लोकभावना विरोधात आहेत. अजूनही पहलगाममध्ये जे २६ निरपराध लोक मारले गेले, त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश संपलेला नाही. अतिरेकी सापडलेले नाहीत. ऑपरेशन सिंदूर आजही चालू असल्याचं सांगितलं जातं. काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या कारवाया थांबलेल्या नाहीत”, असं संजय राऊत म्हणाले.
यावेळी संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या एका विधानाची आठवण करून दिली. “पंतप्रधान म्हणाले खून और पानी एकसाथ नहीं बहेगा.. आमचा प्रश्न आहे की खून और क्रिकेट एकसाथ कैसे चलेगा? आमच्या महिलांचं सिंदूर उजाडलेलं इतक्या लवकर कसे विसरलात? सरकारचं सोडून द्या. भाजपा, आरएसएस, बजरंग दल, विहिंप जे भाजपाचे प्रचारक आहेत त्यांची भारत-पाकिस्तान सामन्याविषयी काय भूमिका आहे? हे स्पष्ट करावं”, असं आव्हानच संजय राऊतांनी दिलं आहे.
१४ सप्टेंबरला ठाकरे गटाचं आंदोलन
दरम्यान, १४ सप्टेंबरला ठाकरे गटाकडून आंदोलन केलं जाणार असल्याचं संजय राऊत म्हणाले. “उद्धव ठाकरेंनी या सामन्याचा निषेध केला आहे. १४ सप्टेंबरला शिवसेनेची महिला आघाडी रस्त्यावर येईल. माझं कुंकू, माझा देश अशा प्रकारचं आंदोलन त्या दिवशी केलं जाईल. त्यानंतर महाराष्ट्रातील लाखो महिला नरेंद्र मोदींना सिंदूर पाठवणार आहेत”, असं त्यांनी सांगितलं.
“भाजपावाले विरोधकांना राष्ट्रभक्तीच्या गोष्टी शिकवतात. पण बाळासाहेब ठाकरेंनी भारत-पाकिस्तान सामन्याला कायम विरोध केला. जावेद मियाँदाद घरी आला होता तेव्हा त्याला ठणकावून सांगितलं की चहा प्यायचा आणि निघून जायचं. एकीकडे तुम्ही काश्मीरमध्ये रक्त सांडत असताना क्रिकेट खेळायला आमच्याकडे येता कसे? लाजा वाटत नाहीत का तुम्हाला? तोंडं उघडा की. ते बाटगे सरकारमध्ये शिवसेना म्हणून बसले आहेत. बाळासाहेब ठाकरेंचा विचार होता भारत-पाकिस्तान सामना होणार नाही. काय करतायत मिंधे? त्यांचे आमदार-खासदार, पुढारी?” असा सवाल संजय राऊतांनी केला.
भारत-पाकिस्तान सामन्याचा जुगार गुजरातमध्ये – राऊत
दरम्यान, यावेळी राऊतांनी गुजरात व राजस्थानचाही उल्लेख केला. “भारत पाकिस्तान सामन्यात सर्वात मोठी आर्थिक उलाढाल होते. त्यामुळेच हे सामने खेळवले जातात. या सामन्यासंदर्भातल्या ऑनलाईन जुगाराची सगळी सूत्रं राजस्थान व गुजरातमधून हलवली जातात. भाजपाचे प्रमुख लोक त्यात सहभागी असतात”, असा थेट आरोप राऊतांनी केला आहे.