शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. आता त्यांनी भाजपासोबत युती करून नवीन सरकार स्थापन केलं असून मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहे. मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना झटका दिला आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांना सेनेच्या नेते पदावरून हटवलं आहे.

उद्धव ठाकरे यांची स्वाक्षरी असलेलं एक परिपत्रक जारी करत त्यांनी हा आदेश दिला आहे. पक्षाविरोधी कारवाई केल्याचं कारण देत, त्यांना सेनेच्या नेते पदावरून हटवलं आहे. त्यामुळे आता शिंदे गटाकडून कोणता निर्णय घेतला जातो याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. एकनाथ शिंदे यांना सेनेच्या नेते पदावरून हटवल्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “ज्यावेळी एखादे नेते मुख्यमंत्री असतात, तेव्हा ते सभागृहाचे नेते असतात, ते महाराष्ट्राचे नेते असतात. त्यामुळे आता तुम्ही कितीही डाव खेळले तरी आम्ही मागे हटणार नाही. एकनाथ शिंदे आता विधीमंडळाचे नेते बनले आहेत. त्यामुळे त्यांचं छोटं पद गेलं तर त्यामध्ये कमीपणा काय?” असा उलट प्रश्न देखील त्यांनी विचारला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यानंतर शिंदे गटाची भूमिका काय असेल? असं विचारलं असता ते म्हणाले की, “उद्धव साहेबांनी काहीही बोललं तरी आम्ही त्यांच्याविरोधात काहीही बोलणार नाही. ते आमचे नेते आहेत. त्यांनी बोलावलं तर आम्ही त्याच्याकडे जाऊन चर्चा करू,” असंही ते म्हणाले.